नवजात बालिकेची तस्करी करणारी टोळी गजाआड; गोंदिया येथील डॉक्टरसह पाच जणांवर गुन्हा दाखल

*एका महिलेला अटक, मुख्य आरोपी डॉक्टरसह इतर आरोपी फरार
भंडारा:- गोंदिया येथून नवजात बालिकेची तस्करी करून भंडारा शहराजवळील पांढराबोडी येथे विकले. महिला व बालकल्याण विभागाच्या चाईल्ड हेल्प लाईन टोल फ्री क्रमांक १०८ ला माहिती मिळताच पोलिसांनी याप्रकरणाचा शोध लावला. नवजात बाळाची तस्करी करणाऱ्या टोळीतील गोंदिया येथील डॉक्टरसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेला अटक करण्यात आले असून चार आरोपी फरार आहेत.
सदर गुन्हयातील आरोपींची नावे गोंदिया येथील रहीवासी डॉक्टर, मालती प्रकाश वाघमारे, (वय ४४), रा. पांढराबोडी ता. भंडारा जि. भंडारा, ललेश्वरी नंदकिशोर सादेपाच (वय ३९) रा. रामनगर गोंदिया, पौर्णिमा सतिश धुर्वे ( वय ३०) रा. रामनगर गोंदिया व उमेशसिंग रामचंद्रसिंग गहलोत (वय ४८) रा. गोंदिया असे आहेत.
सविस्तर असे की, महिला व बाल विकास विभागभंडारा अंतर्गत चाईल्ड हेल्प लाईन टोल फ्री क्रमांक १०९८ वर दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:२६ वाजता मालती प्रकाश वाघमारे, वय ४४ वर्षे, रा. पांढराबोडी, ता. जि. भंडारा हिने तिचे घरी एक १० दिवसांची नवजात बालिका आणली आहे, अशी माहिती मिळाली.यावरुन चाईल्ड हेल्प लाईन चे समन्वयक सौ. लोकप्रिया देशभ्रतार आणि त्यांचे कार्यालयीन पथक यांनी लागलीच मालती प्रकाश वाघमारे हिच्या घरी ग्राम पांढराबोडी येथे जाऊन चौकशी केली असता, प्राप्त माहितीआधारे तिच्याकडे एक नवजात बालिका मिळुन आली. ती महिला एकटीच जिवन जगत असल्याने, तिने गोंदिया येथुन नवजात बालिका आणल्याचे सांगितले. तसेच अधिक चौकशी साठी तिला बाल कल्याण समिती, भंडारा येथे बोलाविण्यात आले असता, ती समिती समोर हजर झाली नाही. त्यामुळे चाईल्ड हेल्प लाईन कडुन पोलीस स्टेशन, वरठी येथे पत्र व्यवहार करुन प्रकरणाची माहिती देण्यात आली असता, वरठी पोलीस लागलीच सदर महिलेच्या घरी गेले. ती नवजात बालिकेला घेऊन चार चाकी वाहनाने पसार झाल्याची माहिती शेजाऱ्यांकडुन मिळाल्याने तात्काळ वरठी पोलीसांनी या प्रकरणाची माहिती वरीष्ठांना देऊन, वरीष्ठांचे मार्गदर्शनात, पोलीस स्टेशन, मोहाडी अंतर्गत कुशारी फाट्यावर पोलीसांनी नाकाबंदी करुन, वाहन अडकवीले. त्या वाहनाची पाहणी केली असता, त्यामध्ये पौर्णिमा सतिश धुर्वे, रा. राम नगर गोंदिया या महिलेच्या ताब्यात एक नवजात बालिका मिळुन आली आणि त्या महिलेकडे अधिक चौकशी करण्यात आली असता, गोंदिया येथील डॉक्टर याचे सांगण्यावरुन ती महिला त्या नवजात बालिकेला घेऊन जात असल्याचे तिने सांगितले. तसेच त्या नवजात बालिकेच्या माता-पित्या बाबत तिने कोणतीच माहिती दिली नाही आणि अधिकृत कागदपत्रे दिले नाही. त्यानंतर सदर प्रकरणाची नोंद पो. स्टे. वरठी येथे करण्यात आली.
त्यानंतर दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी नवजात बालिकेचे गोंदिया जिल्हयातील रहीवासी असलेले आई आणि वडील हे बाल कल्याण समिती, भंडारा समोर हजर झाले आणि त्यांनी सांगितले की, सदरची नवजात बालिका ही त्यांचे तिसरे अपत्य असुन, वेळे आधी प्रसुती झाल्याने, नवजात बालिकेची प्रकृती बरी राहत नसल्याने, त्यांनी गोंदिया येथील डॉक्टराकडे उपचाराकरीता बालिकेला भरती केले होते. परंतु बालिकेच्या उपचाराचा खर्च पालकांना न परवडणारा असल्याने, नागपुर येथील सामाजिक संस्थेच्या मदतीने बालिकेला उपचाराकरीता नागपुर येथे पाठवितो, असे गोंदिया येथील डॉक्टराने त्यांना सांगितले आहे, असे बालिकेच्या पालकांनी सांगितले. परंतु सदर प्रकरणी अधिक चौकशी करण्यात आली असता, गोंदिया येथील डॉक्टर याची हस्तक नामे
ललेश्वरी नंदकिशोर सादेपाच हिचे खात्यात मालती प्रकाश वाघमारे, रा. पांढराबोडी हिने चेक द्वारे मोठी रक्कम दिल्याचे सांगितले. त्यावरुन, उघड झाले की, गोंदिया येथील डॉक्टराने आपल्या हस्तकांच्या मदतीने त्याच्याकडे उपचाराकरीता असलेल्या नवजात बालिकेला पुढील उपचाराकरीता नागपुर येथे सामाजिक संस्थेकडे पाठवित असल्याचे, नवजात बालिकेच्या पालकांना खोटे सांगुन, त्या बालिकेला मालती प्रकाश वाघमारे, रा. पांढराबोडी हिला विक्री केल्याचे स्पष्ट झाले.
सदर गुन्हयातील आरोपी ललेश्वरी नंदकिशोर सादेपाच हिला अटक करण्यात आली असून, ती सध्या पोलीस कोठडीत आहे. तसेच मुख्य आरोपी गोंदिया येथील डॉक्टर आणि त्याचे इतर साथीदार हे गुन्हा दाखल झाल्यापासुन पसार झाले असून, त्यांचा कशोशीने शोध चालु आहे. तसेच सदर प्रकरणात नवजात बालकांची तस्करी करणारी टोळी सक्रीय असल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत असल्याने, त्याअनुषंगाने अधिक तपास चालु आहे.
सदर प्रकरणी पोलीस स्टेशन, वरठी येथे अपराध क्रमांक ३६/२०२६ कलम १४३ (४), १३७(२), ३(५) भा.न्या.सं. सहकलम ८०, ८१ अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, २०१५ चा दिनांक ०६/०२/२०२६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला असुन, पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांचे मार्गदर्शनात, उपविभागीय पोलीस अधिकारी, साकोली शिवम विसापुरे हे सदर गुन्हयाचा तपास करीत आहेत.









