आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल; यंत्रणा लागली कामाला

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- तुमसर बपेरा राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी ८ फेब्रुवारी पासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले. आंदोलन कर्त्यांची मागणी रास्त आहे ही बाब लक्षात घेता शासनाने दखल घेत आज सकाळी १० फेब्रुवारी पासूनच रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असून शासनाची यंत्रणा सुद्धा कामात गुंतली आहे. तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांचे हस्ते उपोषणकर्त्यांना नींबू पाणी पाजून उपोषण मागे घेण्यात आले. सिहोरा-बपेरा-तुमसर या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असला, तरी मागील ४ वर्षापासून यारस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या मार्गावरून चालणे कठीण झाल्याने नागरिकांच्या मनात असंतोष खदखदत होता.

जानेवारी महिन्याच्या शेवटी शेवटी काम सुरू करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र प्रशासनाच्या या ठिसाळ कारभारामुळे याकडे दुर्लक्ष केल्या जात होते ही बाब लक्षात घेता प्रशासनाच्या विरोधात ८ फेब्रुवारी पासून आंदोलनाची ठिणगी पेटविण्यात आली होती. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी तुमसर चे तहसीलदार उपेश अंबादे आणी पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा केली व रस्त्याचे काम तत्काळ सुरू न झाल्यास रस्ता रोको करू’, असा इशारा आंदोलकांनी दिला होता त्या दिशेनेच सिहोरा पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवला होता.

अखेर प्रशासनाने दखल घेतली व ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आ. राजू कारेमोरे, तुमसर मोहाडी विधानसभा प्रमुख देवचंद ठाकरे, खासदार शिशुपाल पटले व बांधकामविभागाचे प्रतिनिधी निंबाळकर यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. १० फेब्रुवारीला सकाळ पासूनच रस्त्याचे काम सुरू होईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते राजेंद्र बघेले आणी विनेश गजभिये यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश पारधी, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ढबाले, माजी सभापती कलाम भाई शेख, उपसभापती सुभाष बोरकर, सतीश चौधरी, डॉ. जितेंद्र तुरकर, विनोद पटले, जितू तुरकर, देवेंद्र मेश्राम, संजय मते, मोतीलाल ठवकर, दिनेश गोमासे, देवानंद लांजे, गोवर्धन शेंडे, परिसरातील सर्व सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *