लाखनीतील सेतू केंद्र संचालकाला ११ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

मूळ कागदपत्रे परत देण्यासाठी मागितली होती लाच; एसीबीचा सापळा यशस्वी

लाखनी : शासकीय कामासाठी दिलेली विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे परत करण्याच्या मोबदल्यात ११ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सेतू केंद्र संचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली. ही धडक कारवाई लाखनी येथील सिंधी लाईन चौकातील ‘नेहा सेतू केंद्रा’त मंगळवारी करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात आणि सेतू केंद्र चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सतीश तुळशीराम मोटघरे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपी केंद्राच्या संचालकाचे नाव आहे.

तक्रारदार हे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. त्यांनी २०२१ मध्ये आपल्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी नेहा सेतू केंद्रामार्फत ऑनलाइन अर्ज केला होता. यावेळी संचालक सतीश मोटघरे याने मुलांची १० वीची गुणपत्रिका, डोमिसाईल प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड आणि कामगार कार्ड अशी सर्व मूळ कागदपत्रे स्वतःकडे ठेवून घेतली होती. शिष्यवृत्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही तक्रारदाराने वारंवार मागणी करूनही मोटघरे कागदपत्रे परत देत नव्हता.

★अशी केली केली वसुली

कागदपत्रे परत करण्यासाठी आरोपीने ३० जानेवारी रोजी तक्रारदाराकडे १२ हजार रुपयांची मागणी केली. यात त्याने सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्याचा वाटा आणि स्वतःचे कमिशन असल्याचे सांगितले. अखेर ११ हजार रुपयांवर तडजोड झाली. लाचेची रक्कम दिल्याशिवाय कागदपत्रे मिळणार नाहीत हे लक्षात आल्यावर तक्रारदाराने भंडारा एसीबीकडे धाव घेतली.

★असा रचला सापळा
३ फेब्रुवारी रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आज १० फेब्रुवारी रोजी दुपारी नेहा सेतू केंद्रात एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने मोटघरेला रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख रक्कमेसह वनप्लस कंपनीचा महागडा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सध्या आरोपीच्या घराची झडती सुरू असून लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरच्या पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार, पोलीस निरीक्षक नितेश देशमुख, उज्वला मडावी आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *