जकातदार विद्यालयाच्या प्रांगणात शब्दांचा जागर
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- “पुस्तके ही केवळ कागदाची पाने नसून ती ज्ञानाचा जिवंत वारसा आहेत. जिल्ह्यातील वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रशासनाचा मानस असून, येणाऱ्या काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक गावी ग्रंथालय निर्मिती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले. महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाद्वारे आयोजित ‘भंडारा ग्रंथोत्सव २०२५’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
स्थानिक जिल्हा परिषद जकातदार विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटनजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश वाकुडकर, नगराध्यक्ष मधुरा मदनकर, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा दांदळे, जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरिगिट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ‘ज्ञानसागर’ या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी प्रास्ताविकातून ग्रंथोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली. जकातदार विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत आणि राज्यगीताचे सादरीकरण केले. या सोहळ्याला डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे, गजानन कोठेवार, संजय नारनवर, घनश्याम कानतोडे, इस्तारी मेंढे, विकास निमकर यांच्यासह मोठ्या संख्येनेवाचक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नरेश आंबिलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाळासाहेब मुंडे यांनी मानले. जकातदार विद्यालयाचे प्रांगण सध्या विविध विषयांच्या हजारो पुस्तकांनी सजले असून, पुस्तक खरेदीसाठी भंडाऱ्यातील वाचकांनी गर्दी केली आहे.









