विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना जागृत होण्यासाठीच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन-शिक्षणाधिकारी मनीषा गजभिये
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- प्रजासत्ताक दिन म्हणजे लोकशाही उत्सव व एक राष्ट्रीय सणच आहे. शालेय विद्यार्थी वर्षभर आपल्या अभ्यासात राहतो त्याला आपल्या देशाप्रति संवेदना व्यक्त करायला व्यासपीठ मिळत नाही. मात्र जिल्हा परिषद भंडारा कडून प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना देशभक्तीपर गीतांच्या माध्यमाने आपल्या देशाविषयी असलेली आपुलकी भावना व्यक्त करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. असे प्रतिपादन मनीषा गजभिये शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी सामाजिक न्याय भवन येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.
जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत शिक्षण विभाग माध्यमिक यांच्यातर्फे सामाजिक न्याय भवन भंडारा येथे विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक मनीषा गजभिये शिक्षणाधिकारी माध्यमिक होते तर अध्यक्ष रवींद्र सोनटक्के शिक्षणाधिकारी प्राथमिक होते. भंडारा शहरातील १३ शाळांनी सदर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला व अत्यंत आकर्षक नृत्य समूहगीत सादर केले.
विद्यार्थ्यांची कला अत्यंत प्रशंसनीय कृती यामध्ये देशभक्तीपर गीते, वंदे मातरम, ऑपरेशन सिंदूर, भारताचे संविधान, अशा विविध विषयावर पथनाट्य व समूह नृत्य शालेय विद्यार्थ्यांनी सादर केले. सदर कार्यक्रमाला रमाकांत झाल्टे, राहुल बावा उपशिक्षणाधिकारी, शंकर राठोड गटशिक्षणाधिकारी भंडारा, रवींद्र माडेमवार, देवेंद्र शेंडे, गिरधारी भोयर विस्तार अधिकारी, हरीकिशन अंबादे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी, रमेश खिलोटे प्राचार्य, मुकुंदा ठवकर आदी उपस्थित होते. सदर विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले यामध्ये ट्रॉफी व सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे संचालन महेश जगनिक मुख्याध्यापक रावणवाडी, बाळासाहेब मुंडे शिक्षक, दिलीप शिंगणजूडे शिक्षक मोहदुरा यांनी केले तर आभार प्रदर्शन रवींद्र माडेमवार विस्तार अधिकारी यांनी केले.









