मेहगाव येथील थरारक हत्याकांडाचा २४ तासांत छडा;तीन आरोपी अटक; २८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी

तुमसर पोलिसांची मोठी कामगिरी

 

राहुल डोंगरे

तुमसर : तालुक्यातील मेहगाव परिसरात एका २८ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, तुमसर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी संयुक्त कारवाई करत तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांत या हत्याकांडाचा छडा लावून तीन आरोपींना रामटेक येथून अटक केली आहे.

 

नेमकी घटना काय?
फिर्यादी पंकज गणेश राणे (३३, रा. मेहेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा लहान भाऊ कपील गणेश राणे (२८) याची अज्ञात आरोपीने २२ जानेवारीच्या रात्री ८ ते २३ जानेवारीच्या सकाळी ११:४५ च्या दरम्यान हत्या केली. मौजा मेहेगावपासून ३ किमी अंतरावर उत्तरेस कपीलचा गळा, डोके, कपाळ आणि कुशीवर धारदार शस्त्राने वार करून त्याला मृत्यूच्या घाटात उतरवण्यात आले होते. याप्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात अप. क्र. ३३/२०२६ कलम १०३ (१) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी तपास पथके गठीत करण्याचे आदेश दिले. आरोपी अज्ञात असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासादरम्यान गोपनीय सूत्र आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसरात असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले आरोपी: १. भुषन सुनिल लांजेवार (१९), रा. मेहेगाव, जि. भंडारा. २. सार्थक नंदकिशोर कठारे (२०), रा. बिट गणेशपूर (हिंगणा), जि. नागपूर. ३. निलेश नरेश नागमोते (१९), रा. पट गोवारी (रामटेक), जि. नागपूर.

पकडण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना शनिवारी तुमसर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, त्या दिशेने पोलीस तपास सुरू आहे.
————@——–+-
तपास पथकाचे कौतुक
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसरचे ठाणेदार पो.नि. गायकवाड, पो.उप.नि. प्रविण सयाम, श्रीचंद गंगवानी आणि त्यांच्या चमूने केली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पो.नि. सोनवाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
पुढील तपास पो.उप.नि. प्रविण सयाम करीत आहेत.
“गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही तांत्रिक पुरावे आणि स्थानिक खबऱ्यांच्या जाळ्याचा प्रभावी वापर केला. आरोपींनी गुन्ह्यानंतर पळ काढला होता, मात्र पथकाने पाठलाग करून त्यांना २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहेत. या हत्येमागील नेमका हेतू काय होता आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास आम्ही करत आहोत. लवकरच संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होईल.”

— प्रवीण सयाम, तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन तुमसर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *