संविधान बचाव संघर्ष समितीच्यावतीने धरणा आंदोलन
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यातील ज्वलंत मागण्यांना घेवून संविधान बचाव संघर्ष समिती जि. भंडाराच्यावतीने आज दि. २३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर धरणा आंदोलन करण्यात करण्यात आले. राज्य सरकारकडून २९ डिसेंबर २०२५ रोजी निघालेल्या पत्रात, राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम साजरे करावयाच्या यादीत जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा समावेश करावे.
भंडारा नगरपंचायत वार्ड क्र ३ मध्ये मतमोजणी दरम्यान उमेदवारांचे नावच ईव्हीएम मशीन मधून गाळ झाले. ह्या गंभीर प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे. व वार्ड क्रमांक तीन चे नगरसेवक व नगराध्यक्ष पदाची नव्याने बायलेट पेपरवर निवडणुक घेण्यात यावी. रमाई आवास योजना व शबरी आवास योजना पूर्ववत सुरू करून पाच लाख रुपये पर्यंतचे घरकुलास अनुदान देण्यात यावे.
भंडारा जिल्ह्यात सन २०२४-२५ ह्या वर्षात विशेष घटक योजनेअंतर्गत गाई म्हशीचे वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांना अर्ध्या किमतीत म्हातारे व निरुपयोगी जनावरे घेऊन देणाऱ्या पुरवठा दारावर व पशुधन विकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच पुरवठादार रद्द करून लाभार्थ्यांना त्यांच्या मर्जीने जनावरे घेण्याची मुभा देण्यात यावी.तालुकास्तरावर ओबीसी मुला-मुलींचे निवासी वसतिगृह सुरू करावेत. शेतकरी कर्जमाफी करतेवेळी सावकारी कर्ज सुद्धा माफ करावे.
आदिवासी आश्रम शाळेत रिक्त शिक्षकांचे पदे तात्काळ भरण्यात यावी. शासकिय आधारभुत धान खरेदी केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ देण्यात यावे व भंडारा सरकारी दवाखान्याच्या जवळील व तकिया रेल्वे क्रांसिंग जवळील झोपडपट्टीत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संविधान बचाव संघर्ष समितीचे मुख्य संयोजक सदानंद इलमे, जिल्हाध्यक्ष रोशन जांभुळकर, अजाबदाराव चिचामे, गोपाल सेलोकर, डॉ. बाळकृष्ण सार्वे, रोशन उरकुडे, प्रभाताई पेंदाम, रमेश शहारे, समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे, जिल्हा सचिव अशित बागडे, कोषाध्यक्ष इंजि. रूपचंद रामटेके, निमंत्रक संजय मते, भगिरत धोटे, सुभाष भिवगडे, संजय मते, अमृत बन्सोड, कॉ. हिवराज उके, राजेश मडावी, विजय भोवते व इतरांची उपस्थिती होती.









