खड्डे चुकविण्याच्या नादात नेक्सा कारचा टायर फुटला, तुमसर-सिहोरा मार्गावरील घटना

सुदैवाने जीवितहानी टळली.
तुमसर :- तुमसर-सिहोरा मार्गावरील खड्ड्यांची समस्या आता प्रवाशांच्या जीवावर बेतू लागली आहे. गुरुवारी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास डोंगरला पुलाजवळ खड्ड्यामुळे अचानक कारचा समोरचा टायर फुटून अपघात घडल्याची घटना घडली.
विशेष म्हणजे कारचा वेग कमी असतानाही रस्त्यावरील खोल खड्ड्यामुळे हा अपघात इतका भीषण होता की कारचा समोरील भाग पूर्णपणे चेंदा-मेंदा झाला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेच्या दिवशी अजय धोटे हे आपल्या नातेवाईकांना घेऊन नेक्सा कारने (क्र. MH 35 BC 1897) तुमसरवरून सिहोरा मार्गे खैरलांजीकडे जात असताना. कारमध्ये त्यांच्यासोबत ॲड. रोहित बोंबार्डे आणि दीप रामटेके हे मागे बसले होते. रात्रीची वेळ आणि रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता अजय धोटे हे अत्यंत कमी वेगाने कार चालवत असताना देखिल डोंगरला पुलाजवळ कार एका खोल खड्ड्यात आदळली दरम्यान कारचे जागीच फुटले. टायर फुटल्यामुळे कारचे संतुलन बिघडले आणि ती थेट पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. त्यात कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
या धडकेमुळे कारच्या इंजिनसह समोरील भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघातात चालक अजय धोटे आणि मागील सीटवर बसलेले त्यांचे साळूभाऊ अॅड. रोहित बोंबार्डे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच सोबत असलेले दीप रामटेके यांनाही किरकोळ दुखापत झाली.वेळेवर मदत मिळाल्याने जखमींना तातडीने उपचार मिळू शकले.
स्थानिक प्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
“तुमसर-सिहोरा मार्ग म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते?” अशी अवस्था झाली आहे. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे शारीरिक आणि आर्थिक नुकसानीला निमंत्रण देणे ठरत आहे. वारंवार तक्रारी करूनही या रस्त्याची दुरुस्ती का केली जात नाही? स्थानिक प्रतिनिधी नागरिकांच्या सुरक्षिततेकडे इतके दुर्लक्ष कसे करू शकतात? असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.









