तुमसर पालिकेत प्रशासकीय फेरबदल; मंत्रालयाचा ‘यू-टर्न’—आता मंगेश वासेकरांकडे अतिरिक्त पदभार!

*मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण वैद्यकीय रजेवर
*२७ जानेवारीच्या निवडणुकीआधीच मोठी हालचाल
तुमसर : तुमसर नगरपरिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात गेल्या २४ तासांत घडलेल्या घडामोडींमुळे एकच खळबळ उडाली आहे. चर्चेत असलेल्या नावांना छेद देत मंत्रालयाने अखेर ‘यू-टर्न’ घेतला असून, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्या वैद्यकीय रजेच्या कालावधीत रिक्त झालेला अतिरिक्त पदभार आता साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने २३ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत.
मंत्रालयाचा तातडीचा निर्णय; शासन आदेश जारी
विद्यमान मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण हे २० जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर आहेत. याच काळात तुमसर नगरपरिषदेत आर्थिक व प्रशासकीय कामकाजासह २७ जानेवारीला होणारी विषय समिती सभापती निवडणूक असल्याने प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली आहे.
नगर विकास विभागाचे अवर सचिव अशोक लक्कस यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार शासन निर्णय (क्रमांक: एमसीओ-२०२६/प्र.क्र.३२/नवि-१४) निर्गमित करत हा पदभार बदल निश्चित केला.
‘प्यारेवाले’ नव्हे, आता ‘वासेकर’!
यापूर्वी तुमसर नगरपरिषदेसाठी भंडारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना जिल्हाधिकारी स्तरावरून प्रभार देण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय सोयीचा विचार करून शासनाने अखेर मंगेश वासेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.
आता चव्हाण यांच्या रजेचा कालावधी संपेपर्यंत तुमसर नगरपरिषदेचे संपूर्ण प्रशासकीय व वित्तीय अधिकार वासेकर यांच्याकडे राहणार आहेत.
निवडणुकीच्या तोंडावरच ‘बदली’चे वारे
तुमसर नगरपरिषदेत मंगळवार, २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विषय समित्यांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीआधीच प्रशासकीय प्रमुख बदलल्याने राजकीय गोटात विविध चर्चांना उधाण आले आहे.
या विशेष सभेत प्रभारी उपविभागीय अधिकारी उपेश अंबादे हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार असून, त्यांना आता नवे प्रभारी मुख्याधिकारी मंगेश वासेकर साथ देतील.
प्रशासनाची दिशा बदलली; पालिकेतील हालचालींना वेग
महत्त्वाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाऱ्यांचा पदभार बदलल्याने तुमसर नगरपरिषदेत आगामी दिवसांत प्रशासनिक निर्णय प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता वासेकर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेतील आर्थिक नियोजन, प्रशासकीय कामकाज आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







