समर्थ महाविद्यालय लाखनीचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांना शामरावबापू कापगते स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- शा. बा. कापगते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, साकोली-सेंदूरवाफा व शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान, साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धेय शामरावबापू कापगते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रातील कर्मयोगी मान्यवरांचा भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्यासाठी, विद्यार्थीकेंद्री अध्यापन पद्धतीसाठी तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील भरीवयोगदानाबद्दल शामरावबापू कापगते स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबवलेल्या उपक्रमांमुळे तसेच शिक्षणाच्या माध्यमातून समाजघडणीचे कार्य केल्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी अरविंद (राजू) वसंतराव हजारे (उमरेड), संघचालक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच खास. डॉ. प्रशांत पडोळे, माजी खास. सुनील मेंढे, विधान परिषद सदस्य परिणय फुके, आम. नानाभाऊ पटोले यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या वेळी जीवनगौरव राष्ट्रसेवा पुरस्कार, मातोश्री महिला पुरस्कार तसेच पत्रकारिता, शेती, वैद्यकीय सेवा, साहित्य, शिक्षक, युवा, श्रमिक, उद्योग, दिव्यांग व कृषी उद्योग अशा विविध क्षेत्रांतील कतर्ृत्ववान व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. समाजासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजकांनी केले आहे.







