अखेर अपघातातील जखमी सविताची मृत्यूशी झुंज संपली
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- बहिणाला गावी जाण्यासाठी बसस्थानकावर सोडून देण्यासाठी जात असलेल्या महिलेच्या स्कुटीला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली होती. यात तिघे जखमी झाल्याची घटना सेंदूरवाफा येथे दि.१५ जानेवारी २०२६ रोजी घडली होती. या घटनेतील गंभीर जखमी महिलेचे पाच दिवसांच्या मृत्यूशी झुंजीनंतर अखेर दि.१९ जानेवारी रोजी रात्री १० वाजता नागपूर येथील खाजगी दवाखाण्यात उपचारादरम्यान निधन झाले. सविता शरद समरीत वय ३५ असे या दुर्देवी मृतक महिलेचे नाव आहे.
सविस्तर असे की, रुपाली विकेश गोबाडे (वय ३१) ही तिची बहिण सविता शरद समरीत (वय ३५) व सविताचा मुलगा शौर्य (वय १०) रा. पिंडकेपार, ह. मु. वाटोळा नागपूर यांना नागपूरला जायचे असल्याने त्यांना साकोली येथे सोडण्यासाठी स्कुटीने जात होते. दरम्यान सेंदूरवाफा हावये लॉजचे अगोदर सेंदूरवाफा ते साकोली जाणाऱ्या सर्विस रोडवर अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या स्कुटीला धडक मारली. यात ते खाली पडून तिघेही जखमी झाले होते. यानंतर चारचाही वाहन चालक वाहनासह पळून गेला. सदर घटनेची पोलीस स्टेशन साकोली येथे नोंद करण्यात आली होती.
अपघातानंतर तिघाही जखमींना उपचारासाठी नागपूर येथे खाजगी दवाखाण्यात दाखल करण्यात आले होते. सवितावर गंभीर अवस्थेत चार पाच दिवस उपचार सुरू असतांना दि.१९ जानेवारीच्या रात्री त्यांचे दुर्दैवी निधन झाले. दि.२० जानेवारी रोजी अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५ वाजता पिंडकेपार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूपश्चात पती व अपघातातून थोडक्यात बचावलेला १० वर्षाचा चिमुकला शौर्य असा परिवार आहे. सदर घटनेने पिंडकेपार व सेंदूरवाफा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.







