मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर “या’ दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
ठाणे:- आगामी काळात विकास व राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरु शकणाऱ्या मुंबई महानगर अर्थात एमएमआरडीए क्षेत्रातील महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्यादृष्टीने सध्या भाजप आणि शिंदे सेनेत प्रचंड रस्सीखेच सुरु आहे.
ठाणे आणि कल्याणडोंबिवली महानगरपालिका वगळता एमएमआरडीए क्षेत्रातील महानगरपालिकांमध्ये भाजपला शिंदे सेनेच्या तुलनेत मोठे यश मिळाले आहे. तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना शह देण्यासाठी कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये शिवसेनेकडून वेगळी भूमिका घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत १२२ नगरसेवक आहेत. यापैकी शिंदे गटाचे ५३ आणि भाजपचे ५० नगरसेवक निवडून आले आहेत.
या महानगरपालिकेत भाजपशिवसेनेने युतीत निवडणूक लढवली होती. दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांच्या संख्येत फारसा फरक नसल्याने भाजपकडून कल्याण डोंबिवलीत सत्तेत समसमान वाटा मागितला जाऊ शकतो. मात्र, याठिकाणी शिवसेना भाजपसाठी महापौर पद आणि अन्य महत्त्वाची पदे सोडायला तयार नसल्याचे समजते.नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंब्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे उल्हासनगरमध्ये शिंदे गटाचा महापौरपद बसू शकतो.









