बावनथडीच्या पाण्याने उन्हाळ्यातही फुलणार शेती
राहुल डोंगरे तुमसर (दै. लोकजन)ः- तुमसर आणि मोहाडी तालुक्याची “भाग्यरेषा’ मानल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाचे पाणी यंदा उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचणार आहे. १० जानेवारीपासून कालव्यांद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, यामुळे ३९ गावांमधील ५ हजार ८०० हेक्टर जमीन सिंचित होणार आहे. ऐन उन्हाळ्यात शेती हिरवीगार होणार असल्याने दुष्काळाची चिंता मिटली असून बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने बावनथडी प्रकल्प ९० टक्क्यांहून अधिक भरलेला आहे.
प्रकल्पाचे पाणी योग्य रीतीने मिळावे यासाठी प्रकल्प विभागाने सात पाळ्यांचे (ठेींरींळेपी) नियोजन केले आहे. १० जानेवारी२०२६ ला सुटलेले हे पाणी ३० एप्रिल २०२६ पर्यंत विविध टप्प्यांत दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांना मागील वर्षी पाणी मिळाले नव्हते, त्यांना यंदा प्राधान्य देण्यात आले आहे, ज्यामुळे सिंचनाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. प्रकल्पाच्या नियोजनानुसार, उजवा मुख्य कालवा, राजापूर वितरिका, कारली वितरिका, शाखा कालवा क्र. २ आणि रोहना एकलारा वितरिका अशा पाच मुख्य प्रवाहांमधून पाणी सोडले जात आहे.
यामध्ये प्रामुख्याने: राजापूर पट्टा: नाकाडोंगरी, पाथरी, चिखला, आष्टी यासह १२ गावे. शाखा कालवा भाग: आंबागड, बपेरा, उसर्रा, नेरला, पिंपळगाव यासह १५ गावे. इतर क्षेत्र: मांडवी,चिखली, कारली, जोगीवाडा, कळमना या गावांचा समावेश आहे. बावनथडीचे पाणी सुटले असले तरी दरवर्षी “टेल'(कालव्याचे शेवटचे टोक) भागातील शेतांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याची ओरड असते. तसेच प्रकल्पा शेजारची काही गावे आजही लाभापासून वंचित असल्याच्या तक्रारी आहेत. या तांत्रिक अडचणींवर प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे. कालव्यात पाणी सुटताच शेतकऱ्यांनी उन्हाळी धानासाठी “नर्सरी’ (पऱ्हे) टाकण्याच्या कामाला वेग दिला आहे. उन्हाळी धानाचे उत्पादन दर्जेदार येत असल्याने आणि पाण्याची शाश्वती मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.









