सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षकांना १२ तासाचे २०० रुपये
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात तैनात आलेल्या सुरक्षा रक्षकावर अन्याय होत असल्याचे वृत्त नुकतेच पुढे आले आहे. एका सुरक्षा रक्षकाला महिन्याकाठी ६ हजार रुपये मानधन दिल्या जात आहे. १२ तास सेवा दिल्यानंतरही फक्त २०० रुपये दर दिवसाला दिले जात आहे. मानधनात वाढ करण्याची मागणी सुरक्षा रक्षक करीत आहेत. परंतु निविदा कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आल्याचे सांगितले जात आहे.
सातपुडा पर्वताच्या सानिध्यात व घनदाट जंगलात असणाऱ्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात सुरक्षा रक्षकांची नियुक्ती निविदा कंत्राटदाराने केली आहे. सुरक्षा रक्षकांच्या कर्तव्यासाठी दोन शिफ्ट तयार करण्यात आलेल्या आहेत. सकाळ ते सायंकाळ आणि सायंकाळ ते सकाळ असे दोनच शिफ्ट आहेत. यात ३ सुरक्षा रक्षक कर्तव्य बजावत आहेत. सकाळ पाळीत १ व रात्र पाळीत २ सुरक्षा रक्षक कर्तव्य बजावत आहेत. सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करताना कोणतीही अट नाही. मग तो महाराष्ट्राचा असो किंवा मध्यप्रदेशातील नागरीक त्याची सुरक्षा रक्षक पदावर नियुक्त केली जात आहे.
या सुरक्षा रक्षकांना महिन्याचे ६ हजार रुपये मानधन दिले जात आहे. १२ तास जंगलात जीवाची पर्वा न करता जीव मुठीत धरून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांना प्रत्येकी २०० रुपये हे तुटपुंजे दर दिले जात आहे. हे दर अल्प असल्यानेअनेक वेळा मानधनात वाढ करण्याची मागणी केली परंतु निविदा कंत्राटदार दुर्लक्ष करीत असल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षा रक्षकांना कोणत्याही सेवा आणि सुविधा उपलब्ध नाहीत. सुरक्षा रक्षकांची हजेरी बुक नाही. दिवाळीत बोनस सुद्धा दिले जात नाहीत. ११० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षकांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे विदारक चित्र सध्या दिसून येत आहे.







