नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातून अवैध वाळू उपसा; संबंधित विभागाचे दुर्लक्ष…!

गोंदिया :- सडक अजर्ुनी तालुक्यातील उमरझरी ते चिरचाडी कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, संबंधित कंपनीकडून एफडीसीएम अंतर्गत येणाऱ्या कम्पार्टमेंट क्रमांक ५१८ मधील नाल्यातून वाळूचा अवैध उपसा करून ती दुरुस्तीच्या कामात वापरली जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर वाळूची साठवणूकपूरुन ठेवण्यात आली आहे.

हा भाग नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन क्षेत्रातील असल्याने एफडीसीएमचे अधिकारी यांनी सोमवार १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता धडक देत संबंधितावर कारवाई केली. विशेष म्हणजे उत्खनन केले जात असलेला परिसर हा संवेदनशील व्याघ्र क्षेत्र असून, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येते. अशा संवेदनशील व्याघ्र अधिवासात कोणतेही काम करताना आवश्यक परवानगी, विभागीय पूर्वसूचना व पर्यावरणीय व वन्यजीव संरक्षणात्मक उपाययोजना राबविणे अनिवार्य आहे. मात्र, प्राथमिक तपासात संबंधित कंपनीने यापैकी कुठल्याच बाबींचे पालन केले नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना स्वतःच्या कंपनीचे नावदेखील माहिती नसल्याचे तसेच त्यांच्याजवळ कोणताही वैध वर्क ऑर्डर उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.

ही बाब कामकाजातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून, नियमबाह्य व अनधिकृत स्वरूपात काम सुरू असल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती सेवा या संस्थेमार्फत तत्काळ संबंधित एफडीसीएम कार्यालयास देण्यात आली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी जांभळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व नियमांनुसार जप्तीची कार्यवाही केली. एक पोकलॅन मशीन, एक ट्रॅक्टर व एक टिप्पर जप्त करण्यात आले. स्वतंत्र समिती गठित करुन चौकशी करा. घटनेचे गांभीर्य व संवेदनशील वन्यजीव अधिवास लक्षात घेता, स्वतंत्र समिती गठित करून या प्रकरणाची सखोल, पारदर्शक व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तसेच अवैध वाळू उपसा, पर्यावरणीय नुकसान, आवश्यक उपाययोजना न राबविणे व कामकाजातील जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कायद्यानुसार कठोर करण्याची मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *