महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे भंडाराच्या विकासाला चालना: आ.डॉ.परिणय फुके

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- भंडारा शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ अंतर्गत मुजबी ते जुना कारधा दरम्यान सुरु होणाऱ्या चौपदरीकरणाच्या कामाची आ. डॉ. परिणय फुके यांनी दि. १८ जानेवारी रोजी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन सखोल पाहणी केली. हा मार्ग भंडारा शहरातून जाणारा मुख्य वदर्ळीचा रस्ता अ रस्ता असून, या प्रकल्पामुळे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान व सुकर होणार आहे.

या पाहणीदरम्यान आ.डॉ. परिणय फुके यांनी चौपदरीकरणाच्या संपूर्ण आराखड्याची माहिती घेतली. रस्त्याची एकूण रुंदी, दर्जेदार डांबरीकरण, साइड ड्रेनेज सिस्टीम, पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी योग्य निचरा व्यवस्था, सर्व्हिस रोडची रचना, सिग्नलयंत्रणा, पादचारी व दुचाकीस्वारांसाठी सुरक्षितता तसेच अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक संरक्षक उपाययोजना यावर त्यांनी विशेष भर दिला. काम सुरु करतांना व्यापारी, नागरिक, शाळकरी मुले व रुग्णवाहिकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी टप्प्याटप्प्याने काम करण्याचे तसेच पर्यायी मार्गांची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यासोबतच, कामाचा दर्जा, पारदर्शकता आणि वेळेत पूर्तता याबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापाहणीप्रसंगीभंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक नरुलहसन, प्रोजेक्ट मॅनेजर अभिषेक यादव, रोड डिझाईनकन्सल्टंट अरविंद जैन, तसेच कॉन्ट्रॅक्टर बिष्णोई उपस्थित होते. त्यांनी प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी, कामाचे विविध टप्पे, वाहतूक व्यवस्थापन आराखडा आणि अपेक्षित कालमर्यादा याबाबत सविस्तर माहिती दिली. सदर चौपदरीकरणप्रकल्पाची एकूण लांबी सुमारे ९ किलोमीटर असून, यासाठी अंदाजे ७९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. हा प्रकल्प दि. २१ जानेवारी २०२६ पासून अधिकृतपणे सुरु होत असून, निश्चित कालावधीत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भंडारा शहरातील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होईल, अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल तसेच शहराच्या औद्योगिक, व्यापारी व सामाजिक विकासाला मोठीचालना मिळेल.

यापाहणीप्रसंगीभाजपाजिल्हाध्यक्षआशु गोंडाने, नगराध्यक्षा मधुरा मदनकर, उपाध्यक्ष चंद्रकला भोपे, ज्योती मोगरे, सचिन कुंभलकर,भगवान बावनकर, मुस्ताक उर्फ बल्ली पटेल, प्रशांत निंबोळकर, रुबी चड्डा, अक्षय भिवगडे, अजय ब्राम्हणकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलतांना आ. डॉ. परिणय फुके म्हणाले, भंडारा शहराच्या वाढत्या लोकसंख्या व वाहतूक गरजा लक्षात घेता हा चौपदरीकरणाचा प्रकल्प अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करणे हीच आमची प्राथमिकता आहे. या प्रकल्पामुळे भंडारा शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल. सुरु होणाऱ्या या चौपदरीकरणाच्या कामामुळे भंडारा शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून, नागरिक, व्यापारी वर्ग व वाहनचालकांकडून या प्रकल्पाबाबत समाधान व सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *