ठेकेदाराच्या जाचक अटीमुळे बीटीबीचा वाद पुन्हा रस्त्यावर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा शहरातील वादग्रस्त बि. टी. बी. चा वाद ठेकेदाराच्या जाचक कर वसुली प्रकरणामुळे आज दि. १३ जानेवारी रोजी सकाळी उफाळून आला. शेतकऱ्यांकडून बेकायदेशिर प्रति बोरा २० रुपये व प्रति बॅग ५ रुपये वसुल करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. रस्त्यावर माल फेकून निषेध व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे काही वेळ मोठा गोंधळ माजला. अनेकांचा भाजीपाला रस्त्यावर फेकण्यात आला.

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद शांत झाला. भाजीपाल्यांना भाव अतिशय कमी आहे. त्यातच मकरसंक्रात असल्याने भंडारा शहरातील बिटीबी भाजी मंडीत दररोजप्रमाणे पहाटे तीन वाजतापासून शेतकरी आपला भाजीपाला व फळ विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात मंडीत पोहोचले. मात्र यावेळी बिटीबी ठेकेदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून प्रती बोरा २० रुपये व बॅगमागे ५ रुपये कर वसुली सुरू केली. भाजीपाला आणणाऱ्या वाहनांकडूनही मोठ्या प्रमाणात ठेकेदार कर वसुली करीत होता. यासाठी पावत्या फाडण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनीकेला. या वसुलीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. काही वेळासाठी मंडीचा गेट बंद करण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकरी व ठेकेदार यांच्यात जोरात वाद झाला.

काहींनी रस्त्यावर आपला माल विकला तर काहींनी रस्त्यावर फेकला. अशोका हॉटेलकडून सामान्य रुग्णालयात जाणारा रस्ता गर्दीमुळे बराच वेळ बंद होता. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच अप्पर पोलस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, भंडारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार उल्हास भुसारी यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शेतकरी व व्यापारी यांच्यात मध्यस्थी केली. त्यांच्याप्रयत्नानंतर अखेर वाद शांत झाला.

यावेळी नगरसेवक भगवान बावणकर, भंडारा नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी आकाश शहारे देखील उपस्थित होते. शहारे यांनी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा कर घेतल्या जात नाही, कर फक्त दलालांकडूनच वसूल केला जात असल्याचे सांगितले. जर कोणी शेतकऱ्यांकडून कर वसूल करीत असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले. भगवान बावणकर यांनी शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी शेतकरी, स्थानिक प्रशासन व बिटीबी यांच्यात बैठक घेण्याचे आवश्यक असल्याचे सांगितले. आता प्रशासन याकडे काय भुमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *