कोकणागड येथील खुनातील दोन्ही आरोपी अटकेत
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- कारधा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात असलेल्या कोकणागड गावातील मुळ रहीवासी असलेले किशोर धर्मा कंगाले (वय ६५) रा. भंडारा यांच्या खून प्रकरणात त्यांचे जावई अमित रमेश लांजेवार व त्याचा सोबत योगेश उर्फ गपपु फनिंद्रा पाठक दोन्ही रा. शिवाजी वॉर्ड, शुक्रवारी, भंडारा यांना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर असे की, दि. ११ जानेवारी रोजी किशोर धर्मा कंगाले यांचे प्रेत धारगांव ते कोकणागड जाणाऱ्या डांबरी रोडवरील पुलाचे सिमेंट पायलीमधे मिळुन आले होते. कारधा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. मृतक किशोर कंगाले यांचा जावई अमित लांजेवार हा सुध्दा बेपत्ता होता. त्यामुळे त्याचा व त्याचे मित्राचा शोध घेवुन त्यांना तातडीने जेरबंद करण्याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांना दिले.
आरोपीतांचे शोधाकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे चार पथक तयार करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रीच नागपुर, रामटेक भागात आरोपी शोध करीता रवाना झाले होते. परंतु आरोपी अमित रमेश लांजेवार याने तो कुठे आहे याबाबत कोणासोबतही संपर्क केलेला नसल्यामुळे तसेच आपला थांगपत्ता कोणसही लागु नये याची तो पुर्णतः खबरदारी घेत असल्यामुळे त्याचे वास्तव्याची माहीती पोलीसांना मिळुन येत नव्हती.
प्रत्येक माहीतीची शहानिशा करीत अमित रमेश लांजेवार यास ताब्यात घेतले व त्यास विश्वासात घेवुन त्याने दिलेल्या माहीतीवरुन गुन्हयातील त्याचा सोबती योगेश ऊर्फ गप्पु फनिंद्रा पाठक दोघेही रा. शिवाजी वार्ड शुक्रवारी भंडारा यांना दि. १२ जानेवारी रोजी रात्री अटक करण्यात आली. गुन्हयाचा पुढील तपास कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत साखरे हे करीत आहेत.







