नगर परिषदेच्या निष्काळजीपणांमुळे उघड्या नाल्यात एकाच ठिकाणी दोन अपघात
दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर :- तुमसर नगर परिषदेचा निष्काळजीपणा आणि स्थानिक जनप्रतिनिर्धीचे दुर्लक्ष पुन्हा एकदा नागरिकांच्या जिवावर बेतत असल्याचे समोर आले आहे. शहरातील उघड्या नाल्यांमुळे एकाच ठिकाणी अवघ्या काही वेळात दोन भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सोमवार, २० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवघ्या १० मिनिटांत पडलेल्या पावसामुळे रस्ते आणि नाले जलमय झाले. रस्ता व नाल्याचा अंदाज न आल्यामुळे एकाच ठिकाणी दोन नागरिक उघड्या नाल्यात कोसळले. घटना घडताच स्थानिक ‘आरती फोटो स्टुडिओ’चे नितेश गुरवे यांनी तत्परता दाखवत तातडीने मदतीला धाव घेतली आणि नागरिकांना बाहेर काढले.
पावसाळ्याचे दिवस सुरू होऊनही नगर परिषदेने नालेसफाई व उघड्या नाल्यांवर सुरक्षतेच्या दृष्टीने ढापे टाकण्याचे काम पूर्ण केलेले नाही. नाले व रस्ते तुंबल्याने वाहनधारक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. नगर परिषद प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांच्या या उदासीन कारभारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली थरारक घटना!
“नगर परिषदेच्या ढिम्म कारभारामुळे नागरिकांचा नाहक बळी जाण्याची वाट प्रशासन पाहत आहे का? शहरातील सर्व उघड्या नाल्यांवर तातडीने ढापे बसवून रस्ते व नाल्यांची स्वच्छता करण्यात यावी, अन्यथा नगर परिषदेच्या या निष्काळजीपणाविरोधात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल.”
– अमित मेश्राम, स्वराज्य युवा एकता फाउंडेशन तुमसर
“दरवर्षी पावसाळ्यात आमच्या घरासमोर मोठ्या प्रमाणावर पाणी सावरून तलावाचे स्वरूप येते. याच नालीमधून पिण्याची पाइपलाइन गेलेली आहे, जी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक व नगरपालिका प्रशासनाला अनेकदा सांगून पाइपलाइन दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची विनंती केली, पण नेहमीची दुर्लक्ष करण्यात आले. प्रशासनाने यावर तात्काळ योग्य ती कारवाई करावी.”
– नितेश गुरवे, तुमसर








