ग्रामीण भागातील विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- ग्रामीण भागातील विकास प्रामुख्याने करण्यासाठी केंद्र शासनाच्या ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या योजनांचे परिचालन दिशा योजनेमधून दिशा समितीच्या माध्यमातून होते. ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने व प्रयत्नपूर्वक काम करावे, असे निर्देश खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आज दिले.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी सावन कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे,उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्यासह दिशा समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला मागील बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन व त्यावर झालेल्या कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये आमदार राजू कारेमोरे तसेच अन्य सदस्यांनी सहभाग घेतला. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत लाभार्थ्यांना होणाऱ्या पेटी वाटपामध्ये गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने सॉफ्टवेअर अपग्रेडेशन सुरू असल्याची माहिती कामगार विभागाने दिली. गेल्या बैठकीस अनुपस्थित असलेल्या विभागप्रमुखांकडून प्राप्त खुलासे यावेळी खासदार महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा व सुरू असलेल्या कामांची माहिती विचारली असता, जिल्ह्यात सध्या ३ लाख ३० हजार २३६ सक्रिय मजूर असून ३ लाख ११ हजार ६०४ जॉब कार्ड निर्गमित झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) यांनी दिली. जिल्ह्यात दर्जेदार खेळाडू निर्माण होण्यासाठी “खेलो इंडिया’योजनेअंतर्गत क्रीडांगण विकासाचा तसेच गुणवंत खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्री. पडोळे यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री रोजगार योजना, प्रधानमंत्री रोजगार योजना तसेच मुद्रा योजनेअंतर्गत किती बेरोजगारांनी लाभ घेऊन स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत, याबाबत यशोगाथा प्रसिद्ध करण्याचे निर्देश खासदारांनी दिले. जल जीवन मिशनबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या पातळीवर स्वतंत्र आढावा बैठक घ्यावी, असे निर्देशही डॉ. पडोळे यांनी दिले.

जल जीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या रिचार्ज शाफ्ट उपाययोजनांचा पुनरुज्जीवनआढावा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पाणलोट विकास घटक), मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, प्राथमिक शिक्षण विभागाच्या योजना तसेच समग्र शिक्षा अभियान (जिल्हा परिषद, भंडारा) यांच्या कामांचा आढावा खासदार महोदयांनी घेतला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण ९६ हजार ३१८ गॅस कनेक्शन वितरित करण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली. घरकुल योजनेच्या प्रगतीचा आढावाही डॉ. पडोळे यांनी घेतला. तसेच राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात महसूल व भूमी अभिलेख विभागाकडील अभिलेखांचे स्कॅनिंग काम पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीचे संचलन प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा विवेक बोंद्रे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *