श्री क्षेत्र कुंभली येथे उसळणार भाविकांची गर्दी
राकेश बैस, साकोली (दै. लोकजन):- साकोली पासून दक्षिणे कडे तीन किलोमीटर अंतरावर चुलबंद नदी काठावर कुंभली गावच्या शिवेत दुर्गाबाई डोह येथे दुर्गा देवीचे मंदिर असून याच मंदिर परिसरात मकर संक्राती निमित्त दिनांक १४, १५ व १६ जानेवारीला भव्य यात्रा भरते. या यात्रेत यावर्षी पाच लाखापेक्षा जास्त भाविक या ठिकाणी श्रद्धेने येऊन आपली उपस्थिती दर्शवितात तसेच मागील काही वर्षापासून ही यात्रा पाच दिवसभरात आहे. जितके महत्त्व हिंदू धर्मात काशी प्रयागचे आहे तेवढेच महत्त्व या परिसरात विदर्भातील भाविकांकरिता कुंभली येथील दुर्गाबाई डोहा चे आहे विदर्भातील श्रद्धा लोकांकरिता दुर्गाबाई डोह हेच विदर्भातील काशी प्रयाग म्हणून प्रसिद्ध आहे.
ज्याप्रमाणे एखाद्या श्रीमंत कुटुंबातील व्यक्ती मरण पावल्यास मृत व्यक्तीच्या अस्थि ईलाहाबाद (प्रयाग) येथे संगमात प्रवाहित केल्या जाते. त्याचप्रमाणे परिसरातील शेतकरी गरीब कुटुंबातील व्यक्ती मरण पावल्यास त्याच्या अस्थि लोकमाता चुलबंद नदीच्या प्रवाहात प्रवाहित करण्याची प्रथा प्रचलित आहे त्यामुळे दुर्गाबार्ई डोहाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. मकर संक्रांति निमित्त येणारे भाविक दिनांक १२ व १३ जानेवारीला येऊन मुक्काम करतात व दिनांक १४ जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतिला पहाटे सकाळी उठून चुलबंद नदीच्या पवित्र पाण्यात अंघोळ करून देवी दर्शन घेऊन पूजा अर्चना करून नंतर यात्रेच्या आनंद घेतात.
पूर्वी यात्रेमध्ये टुरिंग टॉकीज, सर्कस, तमाशा, डांस हंगामा, नृत्य मंडळी, आदी मनोरंजनाचे साधन असायचे. परंतु डान्स हंगामाच्या नावाखाली अश्लीलता वाढत असल्यामुळे काही वर्षापासून पोलीस विभागाकडून डान्स हंगामावर बंदी लावण्यात आली असून सध्या यात्रेमध्ये हॉटेल्स, आकाश पाळणे, जादूचे खेळ, हस्तकला कौशल्याची दुकाने, संत कीर्तन, भजनी व धार्मिक साहित्य, खेळणी, वाणाचे सामान, ग्रह उपयोगी वस्तू, कापड दुकान, वाहनांची दुकाने, धार्मिक व सामाजिक शिक्षणाच्या प्रदर्शनी, अंधश्रद्धा विषयी समाज प्रबोधन व समाज जागरण अशा विविध प्रकारच्या दुकाने यात्रेत भरत असतात.







