भंडारा शहरातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शहरातील जे. एम. पटेल कॉलेज रोड ते त्रिमुर्ती चौक ते बस स्थानक भंडारा हया रोडवर मागील अनेक महिन्यांपासून मोठमोठे खोल खड्डे पडले आहेत. संबंधीत सा. बा. विभाग तसेच नगर परिषद कार्यालय, हे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. त्या खड्ड्यामुळे एखादया वाहन धारकाचा मोठा अपघात होण्याचीच वाट बघत असावेत. आसपासच्या ग्रामीण भागातुन हया रस्त्यावरून येजा करणाऱ्या नागरिकांना होणारा मनः स्ताप लक्षात घेता हया रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजविण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
भंडारा शहराचा चेहरामोहरा बदलविण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या सत्ताधारी राजकिय नेत्यांनी केवळ टक्केवारीसाठीविकासाच्या नावावर शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्ते खोदून ठेवल्यामुळे, त्या खड्ड्यामुळे आणि धुळीमुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असतांना त्यात भरीस भर म्हणून जे. एम. पटेल कॉलेज रोड ते त्रिमुर्ती चौक ते बस स्थानक भंडारा, मुस्लिम लायब्ररी चौक ते पांडे महाल पर्यंतच्या रस्त्यांवर त्याचप्रमाणे खांबतलाव चौक येथे पडलेल्या खड्ड्यामुळे हया रस्त्यांवरून वाहन चालवितांना वाहन धारकांना कमालीचा त्रास होत आहे. हे खड्डे चुकविण्याच्या नादात भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बस स्टॅन्ड जवळच्या खड्यामुळे छोटे-मोठे अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे. जे. एम. पटेल कॉलेज रोड, खांबतलाव चौक तसेच बस स्थानक भंडारा जवळील रस्त्याचे डांबरीकरण आत्ताच काही महिन्यापूर्वी झाले असताना, त्यावर खड्डे पडणे हे त्या त्या विभागाचे अपयश आहे.
ज्या कंत्राटदारांनी हे काम केले त्या कंत्राटदाराने सदर रस्त्यांची पुढील दोन वर्ष देखभाल करण्याची अट असताना त्या कंत्राटदाराकडून सदर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे सौजन्य तरी अधिकाऱ्यांनी १५ दिवसात दाखवावेत. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नागरिकांचे हित लक्षात घेऊन आंदोलन करण्यास बाध्य राहील, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, शहर प्रमुख राकेश आग्रे, चित्रागंध सेलोकर, गुरुदेव साकोरे, प्रशांत देशमुख, कमलेश बाहे, प्रताप भुरे सोमेश्वर सेलोकर बादल शहारे रोशन दहिरकर आशिष नागोसे भूपेंद्र खेडेकर अनिरुद्ध गाढवे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे.









