सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करतील तर आमदार म्हणून पाठिंबा राहणार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा व पवनी येथे शिवसेनेचा नगराध्यक्ष बनेल, अशी अपेक्षा होती. पण मतदारांनी जो अपेक्षेपेक्षा कमी कौल दिला तो आपल्याला मान्य आहे. निवडून आलेल्या नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवारांचे शिवसेना अभिनंदन करीत आहे.

सर्वांगिण विकासाकरिता प्रमाणिक प्रयत्न करतील तर आमदार म्हणून आपण त्यांना पाठिंबा देवू, असे प्रतिपादन आ. नरेंद्र भोंडेकर यांनी आज विश्रामगृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत केले. आ. नरेंद्र भोंडेकर पुढे म्हणाले, शिवसेनेच्या नगरसेवक म्हणून पाच जागा निवडून आल्या. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण राखीव असतांना शिवसेनेच्या डॉ. अश्विनी भोंडेकर यांना १३ हजार १०३ मते मिळालीत. संघटना कमी आहे, असे समजत नाही. आमदार म्हणून आपण भंडाऱ्यातविकासकामे केली. विकास विरोधकांच्या हातात जाऊ नये म्हणून नगरपरिषद लढविली. मतदार विकासाऐवजी आमच्याच मित्र पक्षाने पसरविलेल्या खोट्या अफवांवर च चुकीच्या प्रचाराला बळी पडले. डॉ. अश्विनी भोंडेकर यांना मागासवर्गीय म्हणून अफवा पसरविण्यात आली.

पण शिवसेना जातपात मानत नाही. विकास कामे निधी अभावी अर्धवट राहिले, त्यामुळे मतदारांना त्रास झाला. त्याबद्दल मी जनतेची माफी मागतो. भंडाराकरिता ३०० कोटींची विकास कामे आणली. फक्त २० ते ३० टक्के निधी मिळाला कामे सुरु आहेत. उर्वरित निधी अभावी कामे बाकी आहेत. मग ३०० कोटींचा भ्रष्टाचार आपण केल्याचा आरोप चुकीचा आहे. जागतिक स्तरावरील प्रकल्प मित्र पक्षाला आवडले नाही. कामे अडविली. कोणतेही काम करतांना निधी विविध विभागाकडून घ्यावाच लागतो. शेवटी पैसा शासनाचा आहे, कामे सुद्धा शासनाचीच असतात. योजना मंजूर करायला वेळा लागते. पण, थांबायला वेळ लागत नाही, असे आ. भोंडेकर म्हणाले.जय पराजयाची चिंता नाही. आपल्याला त्याचा अनुभव आहे. विकासाच्या मुद्यांवर आपण निवडणूक लढली आणि यात शहराचा विकास लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपल्याला आपला भंडारा पवनी विधानसभा क्षेत्र बारामती सारखा करायचा होता, पण शेवटी विरोधकांनी त्यात अडकाव आणला. अजूनही आपल्या आमदारकीला चार वर्षे बाकी आहेत. इमानदारीने निवडणूक झाली असती तर आम्ही जिंकलो असतो. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी जिल्ह्याला मागास ठेवण्यापेक्षा विकासाचे आव्हान स्विकारावे, असे भोंडेकर म्हणाले. पत्रकार परिषदेत संजय कुंभलकर, दीपक गजभिये, डॉ. प्रकाश मालगावे, नरेंद्र बुरडे, विक्की रावलानी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *