काकाच्या निष्काळजीपणाने चार वर्षीय पुतण्याचा मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- लाखांदूर शहरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका मद्यधुंद ट्रॅक्टर चालक काकाच्या बेफिकीर आणि बेजबाबदार वर्तनामुळे हा अपघात घडला असून, यात त्याच्या चार वर्षीय चिमुकल्या पुतण्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास घडली. लाखांदूर येथील रहिवासी निलेश अवसरे (वय २८) हा आपल्या काही सहकाऱ्यांसह ट्रॅक्टरने कामानिमित्त बाहेर पडला होता.

मात्र, प्रत्यक्षात ट्रॅक्टर चालविताना तो पूर्णपणे मद्याच्या नशेत असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षदर्शीनुसार, ट्रॅक्टर अतिशय वेगाने आणि चुकीच्या दिशेने जात होता. अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर आदळला. धडकेचा आवाज इतका जोरदार होत की, काही क्षणांसाठी परिसरात एकच खळबळ उडाली आणि रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. अपघाताची तीव्रता अत्यंत भयावह होती. ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे रस्त्यावरील लोखंडी कठडे पूर्णपणे मोडून पडले.

ट्रॅक्टरची ट्रॉली धडकेनंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटली. या दुर्घटनेत चालक नीलेश अवसरे याच्यासह त्याच्यासोबत असलेला लक्षअवसरे हा गंभीर जखमी झाला. जखमी झालेला दक्ष हा निलेशचा पुतण्या होता. स्वतःच्या कुटुंबातील लहान मुलाला सोबत घेवून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याचा प्रकार समोर आल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. रस्त्यावरपडलेला उलटलेला ट्रॅक्टर आणि चिरडलेले कठडे पाहून अपघात किती भीषण होता, याची कल्पना नागरिकांना आली.

अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काहींनी जखमींना बाहेर काढण्यास मदत केली, तर काहींनी तातडीने रुग्णवाहिकेसाठी आणि मदतीसाठी संपर्क साधला. जखमी चालक नीलेश आणि चिमुकला दक्ष यांना त्वरित लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणी दरम्यान दक्षच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिकउपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *