“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान’ सकारात्मक शिस्तबाबत जिल्हास्तरीय उद्धबोधन कार्यशाळा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, प्रशासकीय, शैक्षणिक कामकाज अधिक सक्षम करणे तसेच शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान, टप्पा ३, आधार, अपार आयडी, संचमान्यता, शालार्थ, विद्यार्थी समग्र माहिती प्रणाली (व्हीएसकी) वर विद्यार्थी उपस्थिती व सकारात्मक शिस्त या विषयांवर जिल्हास्तरीय उद्बोधन कार्यशाळा आज रॉयल पब्लिक स्कूल, भंडारा येथे पार पडली. सदर कार्यशाळेचे आयोजन शिक्षण विभाग, जिल्हा परिषद भंडारा यांच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यशाळेला सर्व उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख तसेच जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या मुख्याध्यापकांना पाचारण करण्यात आले होते. सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) होते. या कार्यशाळेत उपशिक्षणाधिकारी मंगला गोतारणे, राहुल बावा, मोहन उशिरे, रमाकांत झाल्टे, गटशिक्षणाधिकारी अर्चना माटे, सुभाष बावनकुळे, शरद कुकडकर, विस्तार अधिकारी लता धकाते, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विरेंद्र गौतम, जिल्हा प्रोग्रामर प्रकाश काळे तसेच शालार्थ जिल्हा समन्वयक देवानंद घरत, मनोज धावडे, वरिष्ठ लिपिक तसेच भंडारा जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय, शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांची उपस्थिती होती.
कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी सखोल मार्गदर्शन केले. सकारात्मक शिस्त या विषयावर उपशिक्षणाधिकारी राहुल बावा यांनी विद्यार्थीकेंद्रित, समुपदेशक दृष्टीकोनातून शिस्तीची संकल्पना स्पष्ट केली. दंडात्मक शिस्तीऐवजी सकारात्मक व प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थी समग्र माहिती प्रणाली संदर्भात सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विरेंद्र गौतम यांनी माहिती देत डेटा अद्ययावत ठेवण्याचे महत्त्व सांगितले. आधार-अपार लिंकिंग व सरल पोर्टल बाबत जिल्हा प्रोग्रामर प्रकाश काळे यांनी तांत्रिक मार्गदर्शन करत शाळा स्तरावर येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले. शालार्थ, संचमान्यता व व्हीएसकी या विषयांवर शालार्थ जिल्हा समन्वयक श्री. देवानंद घरत यांनी सविस्तर माहिती देत अचूक व वेळेत कार्यवाही करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविंद्र सोनटक्के यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना, आधार-अपार, सामूहिक कवायत व संचलन, सकारात्मक शिस्त, माजी विद्यार्थी संघाची भूमिका, स्पर्धा परीक्षा तयारी, विद्यार्थी सुरक्षा, तसेच सर्वोच न्यायालयाच्या निर्देशानुसार रेबीज आजाराच्या अनुषंगाने मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी , श्वानांचा शाळेत प्रवेश रोखण्यासाठी संरचनात्मक व प्रशासकीय उपाययोजना तसेच इतर अनुषंगिक विषयांवर सर्वसमावेशक मार्गदर्शन केले. शाळा ही केवळ अध्यापनाची जागा नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यशाळेदरम्यान उपस्थित सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच प्राचार्य, मुख्याध्यापकांनी कार्यशाळेतील विषय निहाय सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभावी कार्यवाही करण्याची हमी दिली. ही कार्यशाळा शाळास्तरावरील गुणवत्ता वृद्धी, पारदर्शक प्रशासन व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.







