अनिल किरणापुरे यांची राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कारासाठी निवड

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- श्याम महाजन बहुउद्देशीय विकास संस्था शेडेपार, धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट देवरी व देवरी तालुका पत्रकार संघ देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कृष्ट कृषी कार्य तसेच सेंद्रिय शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या संदर्भात भरीव योगदानाबद्दल परसोडी पं. स. सदस्य व लवारी येथील आदर्श युवा शेतकरी अनिल शिवलाल किरणापुरे यांची यंदाच्या राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि. ४ जानेवारी २०२६ रोजी देवरी येथील धुकेश्वरी मंदिर सभागृहात पार पडणार आहे.

उच्चशिक्षित असलेल्या अनिल किरणापूरे यांनी आधुनिक व शाश्वत शेती पद्धती स्वीकारून त्यांनी शेतीला नवे स्वरूप दिले. तालुका कृषी कार्यालय साकोली, कृषी विज्ञान केंद्र साकोली व पंचायत समिती साकोली यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी शेतीत नवतंत्रज्ञान यशस्वीपणे आत्मसात केले. सध्या ते खरीपात धान, तर रब्बीमध्ये हरभरा, गहू, वाटाणा, पोपट आदी पिकांची लागवड करतात.

भाजीपाला शेतीत विशेष रुची असल्याने काकडी, मिरची, चवळी, वाल, टोमॅटो, वांगी यांचे उत्पादन घेत आहेत. ड्रिप, मल्चिंग, तुषार सिंचन व सेंद्रिय शेती पद्धती वापरून त्यांनी उत्पन्नात दुपटीहून अधिक वाढ साध्य केली आहे. शेतीसोबतच शेळीपालन, कबुतरपालन, मत्स्यपालन, गोपालन व दुग्ध व्यवसाय असे शेतीपूरक उद्योग सुरू करून त्यांनी बहुआयामी उत्पन्नाचा आदर्श निर्माण केला आहे. अनिल किरणापूर हे केवळ यशस्वी शेतकरी नसून ते शेतकरी मार्गदर्शक देखील आहेत. शेतीशाळा, चावडी चर्चा, कृषी मेळावे, प्रदर्शने, महाविद्यालयीन व्याख्याने व प्रत्यक्ष शेतभेटींच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना उत्पन्नवाढ व कर्जमुक्तीबाबत सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. तो सध्या त्यांच्या शेतात ०.८१ हेक्टर मध्ये पिंक तायवान जातीच्या पेरूचे १७०० रोपांची फळबाग व ०.६० हेक्टर मध्ये ७८६ जातीच्या पपई रोपांची फळबाग लागवड केलेली आहे व त्याद्वारे उत्पादन घेत आहेत.

शेती विकास, पर्यावरण संवर्धन, सामाजिक प्रबोधन व युवा सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्कार, प्रगतशील युवा शेतकरी शेतीरत्न पुरस्कार, भाऊसाहेब माने कृषी गौरव पुरस्कार, उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार, प्रगत कृषी तज्ञ पुरस्कार, वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार, पर्यावरण संवर्धन गौरव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार भंडारा जिल्ह्यातील नवोपक्रमशील शेतकऱ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *