गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेला वाघ जेरबंद
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- गोसे खुर्द धारणाच्या उजव्या कालव्यामध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या वाघास जेरबंद करून गोरेवाडा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. सविस्तर असे की, आज दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी ६.४५ वाजता वनपरिक्षेत्र पवनी, सहवनक्षेत्र धानोरी, बिट धानोरी१, गट क्र.२३२ संरक्षित वनामधील गोसे धरणाचा उजवा कालवा मध्ये वन्यप्राणी वाघ जखमी अवस्थेत आढळला. बिटरक्षकांनी सदर माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी यांना दिली असता ते क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच सदर घटनेची माहिती उपवनसंरक्षक, भंडारा वनविभाग भंडारा व सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) वनविभाग भंडारा यांना देण्यात आली. घटनास्थळावरउपवनसंरक्षक, भंडारा वनविभाग भंडारा व सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) वनविभाग भंडारा, सहाय्यक वनसंरक्षक साकोली, सहाय्यक वनसंरक्षक तुमसर, नवेगाव नागझिरा व्याघ्र बचाव दल, आरआरयु भंडारा, आरआरटी भंडारा (कंत्राटी) घटनास्थळावर दाखल झाले.
वाघास जेरबंद करून वैद्यकिय परिक्षण करून पुढील उपचाराकरीता गोरेवाडा नागपूर येथे पाठविण्यात आले. ज्या ठिकाणी वन्यप्राणी वाघ जखमी आढळुन आला त्या परिसरातील स्थानिक लोकांना वन्यप्राणी वाघामुळे मानव वन्यप्राणी संघर्षाची परिस्थिती निर्माण होवुन हानी व इजा पोहचू नये, याकरीता वनकर्मचाऱ्यां मार्फत स्थानिकांना योग्य खबरदारी बाबत जनजागृती करण्यात आली. यामध्ये पवनीचे पोलीस निरीक्षक ब्राम्हणे, सहा. पोलीस निरीक्षक येवले यांचे स्थानिक लोकांची गर्दी कमी करण्यासाठी सहकार्य केले.
उपवनसंरक्षक योगेन्द्र सिंह, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सचिन निलख, साकोलीचे सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो, संरक्षण व अ. नि.) संजय मेढे सहाय्यक वनसंरक्षक, तुमसरचे सहाय्यक वनसंरक्षक भांगाळे यांचे मार्गदर्शनात श्रीमती वृषाली नागदेवे, वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी व पवनी वनपरिक्षेत्रातील (सर्व) वनकर्मचारी, डाँ. मेघराज तुलावी व त्यांचे नवेगाव नागझिरा व्याघ्र बचाव दल, वन्यप्राणी बचाव दल भंडारा, तसेच आरआटीभंडारा, पीआरटी सदस्य या सर्वांनी यशस्वी कारवाई पार पाडली.









