स्वतंत्र महिला जिल्हा रुग्णालयाच्या साहित्य खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- राज्य शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्हयात स्वतंत्र जिल्हा महिला रुग्णालय असावे यानुसार भंडारा शहरात ग्रीन झोन मध्ये असलेल्या वर्षभरात किमान एक दोनदा पूर येत असलेल्या जागेत १०० खाटांचे महिला रुग्णालयाची वास्तु उभी केली खरी. परंतु वास्तुचे काम पुर्णत्वाच्या मार्गावर असतांना दीड वर्षापुर्वी हे महिला रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्य, उपकरणे, मशीन्सच्या खरेदीतून प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे.
या महिला रुग्णालयासाठी जवळपास २८.५० करोड रू. ची खरेदी असतांना आणि जिल्हा शल्य चिकित्सकाला एवढ्या मोठ्या खरेदीचे अधिकार नसतांना केवळ टक्केवारीच्या हव्यासापोटी राजकीय दबावातून वरिष्ठ पातळीवर मॅनेज करून हीखरेदी स्थानिक पातळीवर करण्यात आली. ज्या शल्य चिकित्सकाला ५ करोड रू. हून अधिकचे निविदा काढण्याचे अधिकार नाहीत त्या अधिकाऱ्याला २८.५० करोड रू.चे निविदा काढण्याचे अधिकार मिळतात कसे?
ही खरेदी शासन स्तरावर न करता, जिल्हा शल्य चिकित्सक पातळीवर करण्याचा हेतु तो काय होता? वरिष्ठ प्रशासनाने घालुन दिलेल्या अटीनुसार सदर निविदेची जाहिरात ही दोन वर्तमानपत्रातुन ज्यापैकी एक राज्यस्तरीय व एक विभागीय स्तरावर असणे आवश्यक असतांना जिल्हा शल्य चिकित्सकाने सदर निविदेची जाहिरात भंडारा जिल्हयातून प्रकाशित होणाऱ्या स्थानिक वर्तमानपत्रातून दिली आणि राजकीय दबावातून निविदा मॅनेज करून अशा प्रकारचे वैद्यकीय उपकरणे, साहित्य पुरवठा करण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या प्रिया कुलर इंडस्ट्रीज, भंडारा या एजंसीला दिले. हया एजंसीचा मालक कोणत्या स्थानिक राजकीय नेत्याचा व्यापारी मित्र आहे हे सर्वश्रुत आहे.
सदर कामासाठी आलेल्या निविदा निश्चितेचा तुलनात्मक तक्ता बघितल्यास निविदा मॅनेज झाल्याचे स्पष्ट होते. स्थानिक राजकीय आशिर्वादातून निविदा मॅनेज झाल्यानंतर प्रिया कुलर इंडस्ट्रीजया पुरवठा धारकाने २८.५० करोड रू.चे साहित्य खरेदी फक्त ४ ते ५ करोड रू. मध्ये निपटवून निविदेप्रमाणे आणि आवश्यक असलेल्या गुणवत्ता व संख्येनुसार वस्तु खरेदी न करता प्रशासनाच्या मदतीने शासनाच्या डोळयात धुळ फेकत जवळजवळ २४ करोड रू. चा भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास येते. सदर खरेदी केलेले वैद्यकीय उपकरणे, साहित्य आजही दीड वर्षानंतर महिला रुग्णालयाच्या वास्तुमध्ये, महिला रुग्णालय सुरू न झाल्यामुळे गुंडाळून ठेवलेले आहेत.
यापुर्वी सुध्दा नगर विकास खात्यामार्फत मिळालेल्या फंडातून भंडारा न. प. क्षेत्रात याच प्रिया कुलर इंडस्ट्रीज ने ग्रीन जिमचे काम, ई लायब्ररी, खामतलाव सौंदर्याकरण, मिस्कीन टॅंक गार्डन अशा अनेक कामातून बोगस कामे करून, तर काही ठिकाणी कामे न करताच शासनाचा निधीलाटल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करून ज्या राजकीय दबावाचा वापर झाला तो जनतेसमोर उघड करून पुरवठा धारक प्रिया कुलर इंडस्ट्रीज या कंपनीकडून गंडा घातलेली रक्कम वसुल करून कंपनीला काळया यादीत टाकण्याची मागणी या निवेदनातून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, तालुका प्रमुख तिलक सार्वे, शहर प्रमुख राकेश आग्रे, निलेश चामट, सोमेश्वर सेलोकर, प्रकाश निनावे, जितेंद्रसिंग तोमर, रजत तुमाने, रोशन दहेलकर इत्यादी पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. सदर निवेदनाच्या प्रतिलिपी शिवसेना नेते आ.भाष्कर जाधव, आ. अनिल परब, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार तसेच आ. परिणय फुके यांना पाठविल्या आहेत.









