अग्रिदलाची आग धुमस्तेय, सात महिन्यांपासून वनमजुरांना मजुरीच नाही
दै. लोकजन वृत्तसेवा:साकोली :– पिटेझरी येथील दहा वनमजुरांना अग्नीदलाचे (आग विझवण्याचे) सात दिवसांचे काम मार्च २०२५ मध्ये देण्यात आले. त्या केलेल्या कामाची मजुरी अद्याप देण्यात आली नाही. यासंदर्भात दोन-तीन वेळा पिटेझरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बारसागडे यांना विचारणा करण्यात आली. प्रोसिजर सुरू आहे, असे उत्तर देऊन ते पुढे काही बोलत नाहीत. त्यामुळे मजुरी का मिळाली नाही, याचा राग या वनमजुरांनी व्यक्त केला. शिवाय नागझिरा वन्यजीव विभागावर रोष व्यक्त केला.
वनमजुरांनी यासंदर्भात पिटेझरीतील नवीन नागझिरा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात गुरुवारी निवेदन दिले. त्यानुसार, अविनाश प्रत्येकी, निकेश नेवारे,अतुल टेकाम, देवेंद्र भलावी, हंसू मसराम, गिरीधारी उइके, अविनाश उइके, कोमल पंढरे, रवी मसराम आणि रविंद्र उइके या दहा मजुरांनी मार्च महिन्यात सात दिवस काम केले. हे काम अतिशय जिकिरीचे असते. धोका पत्करून काम केल्यानंतरही सात महिन्यांपासून मजुरी न मिळाल्याने या आदिवासी तरुणांमध्ये वन्यजीव विभागाविरोधातील आग मनात धुमसत आहे. या निवेदनात त्यांनी मार्च महिन्यात केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावा, अशी विनंती केली. संबंधित पत्र हे पिटेझरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नावाने देण्यात आले. परंतु, कार्यालयात कोणताही जबाबदार कर्मचारी नव्हता. अजित कोवे या कंत्राटी कर्मचाऱ्याने निवेदनाची रिसिव्ह कॉपी देण्यास नकार दिला. त्यामुळे हे कार्यालय वाऱ्यावर असल्याचे दिसून येते.









