गोंदिया न. प. निवडणूकीची मतमोजणी लांबणीवर! राज्यातील सर्व नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकांची मतमोजणी आता २१ डिसबरला होणार
गोंदिया:- नऊ वर्षांनंतर होणाऱ्या राज्यातील २५० पेक्षा अधिक नगरपालिका आणि नगर पंचायतीं साठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. नगरपालिका निवडणुकीत खरी चुरस ही महायुतीमधील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या महायुतीमधील तीन पक्षांमध्येच मुख्यत्वे आहे.
न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे २४ नगरपालिका आणि १५४ सदस्यांच्या निवडीसाठी आता २० डिसेंबरला मतदान होईल. तर अन्य नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत असून बुधवारी मतमोजणी होणार होती. याला मुंबई उच्चलयाच्या नागपूर खंडपीठामध्ये आव्हान देण्यात आले होते. यावेळी रद्द झालेल्या निवडणुकीतीलउमेदवारांना जुनी चिन्ह देण्यात यावे तसेच खर्चाची मर्यादा वाढवून देण्यासह सर्व निकाल २१ डिसेंबरला जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ३ डिसेंबरला होणारे मतमोजणीला स्थगिती देत सर्व निवडणुकांचे निकाल हे २१ डिसेंबरला जाहीर करण्याचा निर्णय दिलेला आहे.
न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी एकत्रीत २१ डिसेंबरला घेण्याच्या हालचाली निवडणूक आयोगात सुरु आहेत. मंगळवारीच न्यायालयात त्यावर शिक्कामोर्तब केले. राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. काही ठिकाणी निवडणुका बिनविरोध पार पडल्या. कायदेशीर पेच निर्माण झाल्याने राज्य निवडणूकआयोगाने २४ संपूर्ण नगरपालिका तर १५० पेक्षा अधिक प्रभागांमधील निवडणूक स्थगित केली.
या निवडणुकीत एक कोटीपेक्षा अधिक मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होत आहे. याशिवाय नगरपालिकांसाठी दोनसदस्यीय प्रभाग पद्धत आहे. नगर पालिकेसाठी मतदारांना तीन मते द्यावी लागणार आहेत. नगर पंचायतीसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी अशी दोन मते द्यावी लागतील.









