अनियंत्रित ट्रकची वाहनांना धडक:ट्रक पलटला, चालक फरार
दै.लोकजन वृत्तसेवा पालांदूर:- पालांदूर-मानेगाव राज्य मार्गावर एका ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या सायकल, दुचाकी व चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. यात तिन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. यात स्कूटी चालक चंद्रभान श्रीराम गोंदोळे (६०वर्ष) जेवनाळा, सायकल चालक काजल विनोद गोटेफोडे (१५वर्ष) जेवनाळा, प्रशांत बोरकर (५१वर्ष) लाखनी असे अपघातातील जखमींची नावे आहेत. ही घटना सोमवारला सकाळी साडे नऊ ते दहा वाजे दरम्यान जेवनाळा गावाजवळ घडली. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेनऊ ते दहा वाजताच्या दरम्यान पालांदूरहून मानेगावकडे ट्रक क्र. सी.जी.०४ पी.एल.९०२४ पशुखाद्य घेऊन रवाना झाला.
ह्याच ट्रक चालकाने जेवनाळ्यावरून पालांदूरच्या दिशेने स्वतःच्या खासगी साधनाने येत असलेले एक सायकल स्वार, दुचाकी स्वार व नंतर एक चार चाकी वाहनाला जबरदस्त धडक देत देत ट्रक अनीयंत्रित होऊन पलटला. यात धडक दिलेल्या वाहनांचे फार मोठे नुकसान झाले आहे. धडक दिल्यानंतर लगेच ट्रक चालक मचारणा गावच्या दिशेने पसार झाला. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही सांगितले जात आहे. अपघात होताच तीनही जखमींना पालांदूर येथे दवाखान्यात प्रथामोपचार करून भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. वृत्त लिहीस्तोवर पालांदूर पोलीस घटनास्थळी येऊन पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.









