बॉलीवूड सुपरस्टारच्या उपस्थितीत शिवसेनेचा रोड शो

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडाऱ्यात रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. अश्विनीताई नरेंद्र भोंडेकर आणि शिवसेनेचे सर्व ३४ नगरसेवक उमेदवार यांच्या समर्थनार्थ आयोजित भव्य रोड शोने शहरात प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. या रोड शोचे मुख्य आकर्षण बॉलीवूड सुपरस्टार गोविंदा, अभिनेत्री जरीन खान आणि अभिनेता तुषार कपूर होते. या कलाकारांना पाहण्यासाठी भंडाऱ्यातील रस्ते अक्षरशः खचाखच भरून गेले होते. रोड शो भंडारा सरकारी आयटीआय पासून सुरू झाला.

शहरातील प्रमुख मार्गांवरुन निघाला आणि प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. रोड शोच्या दरम्यान विविध प्रमुख चौकांमध्ये आयोजित सभांमध्ये आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नागरिकांना संबोधित केले.त्यांनी सांगितले की, काही शक्ती भंडाऱ्यात फूट पाडण्याचा, प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण आपण एकत्र आलो तर कोणतीही ताकद भंडाऱ्याला मागे ढकलू शकत नाही. विकासाला विरोध करणे म्हणजे भंडाऱ्याच्या भविष्याशी खेळणे आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. अश्विनीताई भोंडेकर यांनीही रोड शो दरम्यान नागरिकांना संबोधित करताना भंडाऱ्यासाठी आपला व्हीजन डाक्युमेंटची माहिती देत सांगितले की २०२९ पर्यंत भंडारा हे महाराष्ट्रातील विकसित शहरांमध्ये अग्रस्थानी असेल.

दुसरी बारामती म्हणून भंडाऱ्याची ओळख निर्माण करू. सर्व प्रभागांचा समान विकास, पर्यटनवाढ, शैक्षणिक सुविधा, महिला सुरक्षेची हमी आदि विषय शहर विकासाच्या मुख्य एजेंडा असतील.रोड शोमध्ये सहभागी झालेल्या तिन्ही कलाकारांनीही प्रसिद्ध डायलॉग्स म्हणत नागरिकांमध्ये ऊर्जेची लाट निर्माण केली. त्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची दूरदृष्टी, सुरू असलेले आणि होऊ घातलेले प्रकल्प यांचे कौतुक केले.

विशेषतः वैनगंगा जलपर्यटन प्रकल्पाबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की वैनगंगा नदी ही भंडाऱ्याचे वरदान आहे. पर्यटन प्रकल्प पूर्ण झाला की भंडाऱ्याकडे देश-विदेशातून हजारो पर्यटक येतील. रोजगार वाढेल, अर्थव्यवस्था मजबूत होईल, आणि भंडारा पर्यटन नकाशावर झळकेल. या रोड शोमध्ये सर्व ३४ नगरसेवक उमेदवार, शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होते. मार्गावर सर्वत्र नागरिकांनी भव्य स्वागत केले, पुष्पवृष्टी केली, तर अनेक ठिकाणी महिलांनी आरत्या उतरवून उमेदवारांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *