उमेदवारांच्या प्रचाराचा वेग वाढला
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- प्रचाराला फक्त एक दिवस बाकी आहे. अशातच प्रचाराचा वेग वाढला आहे. उमेदवारांच्या आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. “गलोगल्ली’ आणि “डोअर टू डोअर’ प्रचारावर उमेदवारांनी भर दिला आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त परगावी असणाऱ्या मतदारांशी संपर्क केला जात आहे. “भाऊ तेवढं लक्ष असू द्या, यंदा आपली उमेदवारी आहे’ असे म्हणत मतदारांना साद घातली जात आहे. त्यांना मतदानासाठी येण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिल्या जात आहे.
राज्य निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार प्रचाराचा शेवटचा दिवस १ डिसेंबर आहे. मात्र पहिल्या सुचनेनुसार मतदानाच्या २४तासापूर्वी प्रचार थांबवावे लागत होते. यामुळे अनेक उमेदवारांनी आजच प्रचार संपेल म्हणून रॅली काढण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे आजचा दिवस रॅलीने गजबजला. प्रत्येक वॉर्डात उमेदवारांची रॅली काढण्यात आली होती.
रविवार शासकीय सुट्टी असल्याने मतदान घरी असतील, याचाही विचार करण्यात आला. नऊ वर्षानंतर यंदा निवडणुका होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मतदारांनाही आपल्याला “काही मिळेल’ अशी निर्माण झाली आहे. काहांना “जेवण’ मिळत आहे तर काहींना “लक्ष्मी दर्शन’ ही होत आहे. दोन दिवसात लक्ष्मी दर्शनाचा मोठा व्यवहार होणार आहे. सर्वच ठिकाणी सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांत सामना रंगला आहे.









