प्रचाराची धडाकेबाज सुरुवात; वॉर्डावॉर्डात सभा व जाहिर आश्वासने

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, साकोली व पवनी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा ताप वाढत असून सर्वच पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. प्रत्येक वॉर्डात सभा, मतदारांशी प्रत्यक्ष संवाद आणि विकासाच्या मुद्यांवरून आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. दि. २६ नोव्हेंबर रोजी अपक्षांना निवडणूक चिन्ह मिळाले. त्यामुळे त्यांना प्रचार साहित्य मिळायला वेळ लागला. त्यांनीही आपला प्रचार सुरु केला आहे. पक्षीय उमेदवार सभा, प्रचारफेऱ्या आणि जाहीर आश्वासनांद्वारे आपली बाजू जनतेसमोर मांडत आहेत.

शहराचे राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी उमेद्वारांकडून विविध रणनिती आखल्या जात आहेत.नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होताच सर्वच पक्षांचे उमेद्वार तसेच अपक्ष स्पर्धक मैदानात उतरत असून प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत राजकीय हालचाली सुरू असून मतदारांचे मन जिंकण्यासाठी उमेद्वारांकडून विविध पद्धतींचा अवलंब केला जात आहे. वॉर्डागणिक सुरू असलेल्या सभांमुळे शहराच्या गल्ली-बोळांत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या सभांतून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे उमेद्वार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा वर्षाव करत आहेत. मागील पाच वर्षांत झालेल्या आणि न झालेल्या विकासकामांची यादी जनतेसमोर मांडली जात असून यंदाच्या निवडणुकीत कोणत्या दिशेने विकास व्हावा, याबाबत मतदारांना पटवण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणुकीला अजून काही दिवस असले, तरी राजकीय रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक पक्ष आणि अपक्ष उमेदवाराकडून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी नवनवीन रणनिती आखल्या जात आहेत. मतदारांनी कोणावर विश्वास ठेवायचा, कोणाला पुढील पाच वर्षांची जबाबदारी द्यायची, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात प्रचाराचा जोर आणखी वाढणार आहे. यामुळे नगर परिषद निवडणुकीची लढत रंगतदार होण्याचे संकेत मिळतआहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *