भंडारा जिल्ह्यातील तुमसरात अभिषेक कारेमोरे यांचा स्मार्ट सिटीचा दमदार रोडमॅप जाहीर!

गांधीसागर तलावाचे पुनरुज्जीवन, चौपाटी, बोटिंगसह शहर सुरक्षिततेसाठी हायटेक योजना
तुमसर :- तुमसर नगरपरिषद निवडणुकीत सध्या सर्वाधिक चर्चा इंजिनीयर अभिषेक कारेमोरे यांच्या स्मार्ट सिटी ब्ल्यू प्रिंटची होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या कारेमोरे यांनी प्रचारसभेत तुमसरच्या विकासाचे संपूर्ण आराखडेच मतदारांसमोर मांडले असून शहराला ‘गतवैभव’ देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून उपेक्षित ठरलेल्या गांधीसागर तलावाच्या पुनरुज्जीवनाचा या ब्ल्यू प्रिंटमध्ये भव्य आराखडा समाविष्ट आहे. तलावातील बोटिंग व्यवस्था, काठावर मुंबईसारखी आधुनिक चौपाटी, तसेच पुन्हा हरवलेले बगीचा सौंदर्य पुनर्संचित करण्याची घोषणा कारेमोरे यांनी केली. “तलाव पुन्हा जिवंत झाला तर पर्यटन, रोजगार आणि शहराचे सौंदर्य — तिन्ही वाढेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर तोडगा म्हणून संपूर्ण शहरात आणि शहराच्या बाहेर २४ तास कार्यरत सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था उभारण्याची घोषणा त्यांनी केली. “माझ्या कार्यकाळात कॅमेरे बसवले; नंतर मात्र ते बंद पडले. आता ही व्यवस्था पुन्हा सुरू करून शहर पूर्णपणे सुरक्षित करणार,” असे ते म्हणाले.
आरोग्यसेवेच्या संदर्भातही कारेमोरे यांनी महत्त्वाकांक्षी योजना मांडली. शासकीय दवाखान्यासोबत प्रत्येक प्रभागात मोहल्ला क्लिनिक स्थापण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे विशेषत: वृद्ध आणि महिलांना घरच्या जवळच आरोग्य सुविधा मिळणार आहेत.
स्वच्छतेबाबत बोलताना त्यांनी ‘क्लीन सिटी–ग्रीन सिटी’ हा आपला जुना संकल्प पुन्हा पूर्ण ताकदीने राबविण्याची घोषणा केली. शहरातील नाल्यांवरील झाकणांचा प्रश्न, अनेक प्रभागातील अस्वच्छता यावर तातडीने उपाययोजना करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
तुमसरच्या नागरिकांना सर्वाधिक भेडसावणाऱ्या समस्यांपैकी एक म्हणजे पावसाळ्यात मुख्य रस्त्यांवर साचणारे पाणी. या गंभीर प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन देत कारेमोरे म्हणाले, “तुमसर कुठेही मागे राहणार नाही. शहराचा कायापालट हा माझा शब्द आहे.”
इंजिनीयर अभिषेक कारेमोरे यांच्या ब्ल्यू प्रिंटमुळे तुमसरच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून मतदारांच्या आशा-अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.









