राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनीचा भव्य शुभारंभ
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यातील शहापूर येथे राज्य विज्ञान शिक्षण उच्च संस्था, नागपूर आणि एस. जी. बी. डिफेन्स सर्विसेस ज्यु. कॉलेज शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनी २०२५ चा भव्य व उत्साहवर्धक शुभारंभ झाला.
विज्ञाननिष्ठ विचारांना चालना देणे, ग्रामीण भागातील विद्यार्थीविद्यार्थिनींमध्ये संशोधन वृत्ती वाढवणे आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने भरविण्यात आलेल्या या राज्यस्तरीय प्रदर्शनात महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्ह्यांचे एकूण ४७५ विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक तसेच जिल्ह्यांमधील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.
प्रदर्शनाचे उद्घाटन भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या शुभहस्ते व विज्ञान प्राधिकरण संचालक डॉ. रामकुमार अवसरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी म्हणून अहमदाबादचे शास्त्रज्ञ डॉ. सुनील भास्कर व डॉ. संध्या तिवारी, प्राचार्य राजेश रूद्रकार, प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर, शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, मनिषा गजभिये, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. नीतू गावंडे डॉ. हेमलता बांबल, राज्य समन्वयक भारतकुमार लाड, माडमवार, रविंद्र भास्कर, प्रमोद सेलोकर उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. सोबतच परिसरातील अनेक शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे प्रतिनिधी तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्याला हा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी आयोजनाचा बहुमान प्रथमच मिळाला. तसेच महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात झालेले हे प्रथमच राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन ठरले. जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी मार्गदर्शन करतांना, विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेचे कौतुक करत आजची पिढी वैज्ञानिक दृष्टिकोनाने समाजातील समस्या सोडविण्यात कशी मोलाची भूमिका बजावत आहे यावर भर दिला. प्रदर्शनामध्ये पर्यावरण संरक्षण, अक्षय ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य तंत्रज्ञान, शेती सुधारणा अशा विविध विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक मॉडेल्स, रोबोटिक्स, ड्रोन आधारित तंत्रज्ञान, तसेच ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अनेक नव्या संशोधन कल्पनांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले.
विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक क्षमतेला योग्य व्यासपीठ देणे हेच आमचे ध्येय आहे. असे सांगितले. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी इतक्या उत्साहाने सहभाग नोंदविल्याने ही प्रदर्शनी अधिक अर्थपूर्ण ठरली आहे. तसेच या प्रदर्शनीच्या माध्यमातून सर्व बाल वैज्ञानिक व सहभागी मार्गदर्शक शिक्षकांना भंडारा जिल्ह्याचे वन वैभव व सांस्कृतिक वैभव दाखवता यावे हा सुद्धा या आयोजना मागचा एक उद्देश आहे असे प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर सरांनी सांगितले. तसेच या सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांसाठी पुढील दोन दिवस रात्रीला मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले आहे.
उद्घाटनानंतर मान्यवरांनी सर्व स्टॉल्सना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने देशाच्या प्रगतीत योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली. या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीमुळे भंडारा जिल्ह्याला एक अभिमानास्पद व्यासपीठ मिळाले असून, पुढील दोन दिवस ही प्रदर्शनी सर्वांसाठी खुली राहणार आहे. जिल्ह्यातील विज्ञानप्रेमी नागरिक, शिक्षक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने भेट देऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नीतू गावंडे, आभार प्रदर्शन श्री. नरेंद्र पालांदुरकर, सूत्रसंचालन श्री. मुकुंद ठवकर व मनिषा लोंदासे यांनी केले.









