मला द्या फक्त 3 वर्षे — खुर्ची नव्हे, विकसित भंडारा संकल्पसिद्धी… हेच माझं मिशन- डॉ. अश्विनी भोंडेकर

तीन वर्षांनंतर संपले की स्वतःहून नगराध्यक्ष पद सोडण्याचे आश्वासन
भंडारा:- माझा मुख्य व्यवसाय डॉक्टरचा आहे. रोज रुग्णांच्या जीवासाठी लढताना मी एक गोष्ट शिकले—वेळेत घेतलेला निर्णय जीव वाचवतो. म्हणूनच नगराध्यक्षपद माझ्यासाठी पद नव्हे… हे एक मिशन आहे. माझा ध्यास फक्त एकच… विकसित, सुरक्षित आणि आधुनिक भंडारा. जरी नगराध्यक्षाचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. पण मला ना पदाची लालसा आहे, ना सत्तेची हाव. मी फक्त 3 वर्षांच्या करारावर येत आहे. होय, मी केवळ 3 वर्षेच नगराध्यक्ष राहणार आहे. ही तीन वर्षे संपली की, मी स्वतःहून बाजूला होईन… आणि पुन्हा माझ्या डॉक्टर या सेवापेशाकडे परत जाईन. कारण मला पदाची हाव नाही, खुर्चीची मोह नाही. या तीन वर्षांत सुरू असलेली सर्व विकासकामं पूर्ण करून, भंडाऱ्याला आधुनिक, सुरक्षित, स्वच्छ आणि विकसित शहर बनवण्याचा माझा शब्द आहे. या तीन वर्षांत पुढील 50 वर्षांचं भंडारा उभं करायचं आहे. आपण सर्वांनी मिळून पुढील पिढ्यांना अभिमान वाटेल असा भंडारा तयार करायचा आहे. तीन वर्षांनंतर मी स्वतःहून बाजूला होईन. आणि शिवसेनेतील एका वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्याला संधी देईन. कारण मला खुर्ची हवी नाही – मला भंडाऱ्याचा बदल हवा आहे. नेतृत्व म्हणजे खुर्ची पकडून बसणं नाही; नेतृत्व म्हणजे काम पूर्ण करणं. म्हणूनच मी पहिल्या दिवसापासून ‘मिशन मोड’मध्ये काम करणार आहे. भंडाऱ्यातलं कोणतंही काम अर्धवट राहणार नाही, कोणतीही योजना थांबणार नाही- आणि हेच माझं शहरातील प्रत्येक नागरिकाला दिलेलं स्पष्ट, प्रामाणिक आणि निश्चयी वचन आहे.









