मतदारांना विकास हवा, बेघरांसाठी हक्काचं घर व महिला बचत गटांसाठी प्रभागनिहाय स्टॉल – डॉ. अश्विनीताई भोंडेकर
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडाऱ्यासाठी अजून खूप काही करायचं आहे. पर्यटन, स्वच्छता, आरोग्य, रस्ते आणि सर्वांगीण सुविधा यांच्या माध्यमातून शहराचा प्रत्येक कोपरा समानपणे विकसित व्हावा, हा माझा ध्यास आहे.
सुरू असलेली विकासकामं कोणत्याही परिस्थितीत थांबू नयेत. भंडाऱ्यातील बेघर कुटुंबांना प्राधान्याने घर, प्रत्येक प्रभागात कायमस्वरूपी स्टॉल, प्रत्येक प्रभागात एक क्लिनिक व धार्मिक-सामाजिक ठिकाणी डिजिटल ई-लायब्ररी सुरू करण्याचा मानस शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. अश्विनीताई भोंडेकर यांनी व्यक्त केला. या दौऱ्यात संबंधित प्रभागांचे नगरसेवक पदाचे उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. अश्विनीताई भोंडेकर यांनी सांगितले कि नागरिकांना विकास हवा आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच प्रभु श्रीरामाची मूर्ती खामतलाव परिसरात उभी राहिली आहे, तसेच सागर तलाव, छत्रपती संभाजी महाराज बालेद्यान, भंडारा चौपाटी, गोसे पर्यटन प्रकल्प यांसारखे उपक्रम शहराला पर्यटनाचे नवे दालन उघडून देतील. नगरपरिषद निवडणुकीत शहराच्या विकासाचा मुद्दा अग्रस्थानी आला असून, शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. अश्विनीताई भोंडेकर यांनी शहरातील विविध भागांत प्रचार दौरा केला. प्रभाग क्रमांक ६, १२, १३ आणि १४ मधील सिव्हिल लाईन, राजगोपालाचार्य वार्ड, एमएसईबी कॉलनी, विदर्भ हाउसिंग सोसायटी, राजीव गांधी चौक, साई मंदिर परिसर, मुस्लिम लायब्ररी, पांडे महल परिसर, संताजी मंगल कार्यालय, हलधरपुरी, बजरंग चौक, हेडगेवार चौक, योगी तलाव आणि बुद्धविहार परिसरात त्यांनी घराघरात जाऊन संवाद साधला.
डॉ. अश्विनीताई भोंडेकर यांनी पुढे सांगितले कि भंडाऱ्यासाठी अजून खूप काही करायचं आहे. शहर पर्यटन नकाशावर यावं, प्रत्येक घरापर्यंत सुविधा पोहोचाव्यात आणि प्रत्येक भाग समानपणे विकसित व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. सुरू असलेली विकासकामे थांबता कामा नयेत, हा निर्धार आहे. डॉ. अश्विनीताई भोंडेकरच्या या दौऱ्यात महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. शहराला आता शिक्षित, उत्तम प्रशासकीय अनुभव आणि काम करणारे नेतृत्व हवे, अशी भावना मतदारांनी व्यक्त करत आहेत.









