२ तारखेला भंडारा शहराच्या विकासासाठी घड्याळाचे बटन दाबा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. अध्यक्षपदाचे उमेदवार सुषमा सुनिल साखरकर व इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी आज खा. प्रफुल पटेल यांनी प्रचार सभा घेतल्या. यावेळी त्यांनी २ तारखेला भंडारा शहराच्या विकासासाठी घड्याळाचे बटन दाबण्याचे आवाहन केले.

या प्रचार सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारात नवचैतन्य निर्माण झाले आहे. या प्रचार सभेत खा. प्रफुल पटेल म्हणाले, नऊ वर्षात सत्ताधारी पक्षाने भंडारा शहराचा कोणता कायापालट केला, हे दिसत आहे. विकासाच्या नावाने भुलथापा देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

या अगोदर विकासाच्या भूलथापा देणाऱ्यांनी सत्ता उपभोगली. शहरातील जनतेच्या हितासाठी काय केले? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीत सर्वच उमेदवार आम्ही ते करणार, ते करणार असे सांगत आहेत. शहराचा कायापालट फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते. सुषमा सुनिल साखरकर ह्या शहराच्या विकासाठी उत्तम आहेत. त्यांच्याजवळ शहराच्या विकासाचा व्हिजन आहे. भंडाराकरांसाठी २४ तास सेवा देण्याची त्यांची तयारी आहे. यासाठी त्यांना निवडून देणे आवश्यक आहे.

मतदारांनी खोट्या आश्वासनाला बळी न पडता येत्या २ तारखेला घड्याळाचेच बटन दाबा, असेही ते म्हणाले. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शहरातील सर्व प्रभागात नुक्कड सभा घेऊन सुषमा साखरकर तसेच इतर ३५ नगरसेवक उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचाराचा धडाका लावला. यावेळी सुषमा साखरकर यांनी महिलांच्या समस्यांवर विशेष लक्ष देण्याचा निर्धार व्यक्त केला.महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपक्रम राबविण्याची ग्वाही त्यांनी दिल्याने महिला मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *