नवजात बाळासह पत्नीचा मृत्यू; पतीचे आमरण उपोषण
लाखांदूर :- ग्रामीण रुग्णालय, लाखांदूर येथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांच्या कथित निष्काळजीपणामुळे पत्नीचा आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप विवेक शहारे (रा. आसोला) यांनी केला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून त्यांनी २५ नोव्हेंबर रोजी मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या आशयाचे निवेदन लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांना दिले आहे. रीना विवेक शहारे व नवजात बालक यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी त्यांनी वारंवार प्रशासनाचे दरवाजे ठोठावले. जिल्हाधिकारी,
जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा आणि पोलिस अधीक्षक, भंडारा यांच्याकडे त्यांनी लिखित व मौखिक स्वरुपात तक्रारी केल्या. मात्र, कोणत्याही अधिकारी स्तरावरून यावर ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी पोलिस स्टेशन, लाखांदूर येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रार स्वीकारण्यास नकार दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. न्याय न मिळाल्याने ते आता ग्रामीण रुग्णालय, लाखांदूर समोर आमरण उपोषणाला बसले आहे.









