शहराच्या विकासासाठी डॉ. अश्विनी भोंडेकर व शिवसेना उमेदवारांना निवडून द्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा शहराच्या विकासासाठी आपण आजपर्यंत जे कुणालाही शक्य झाले नाही तेवढा निधी आणला आहे. त्यामुळे विकासाचा झंझावत सुरु आहे. शहराचा कायापालट करण्यासाठी उच्च शिक्षित डॉ. अश्विनी भोंडेकर यांना निवडून द्या, असे आवाहन आ. नरेंद्र भोंडेकर यांनी शहराच्या विविध प्रभागात घेतलेल्या प्रचार सभेत केले. शिवसेनेच्या भंडारा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. अश्विनी भोंडेकर यांच्या विजयासाठी आ. नरेंद्र भोंडेकर व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

दिवसभर विविध प्रभागात ते प्रचार सभा घेत आहेत. या प्रचार सभेतून ते मतदारांना आपण शहराच्या विकासासाठी किती निधी आणला, कोणते काम केले ते समजावून सांगत आहेत. भविष्यात आपण कोणते काम करणार आहोत, ते सुद्धा सांगत आहेत. नवीन पाणी पुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, खांब तलाव येथे श्रीराम पुतळा व चौपाटीचे निर्माण करण्याचे काम आपल्यामुळेच झाले आहे. जलपर्यटनातून हजारो लोकांना काम मिळणार आहे. देशातीलच नाही तर जगातील पर्यटक भंडारा जिल्ह्यात येणारच आहेत. यामुळे भंडारा शहर जगाच्या नकाशावर येणार आहे. यासाठी शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून द्या, असेही आवाहन ते प्रचार सभेत करीत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *