डॉ. अश्विनी भोंडेकर यांनी साधला मतदारांशी संवाद
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. अश्विनीताई नरेंद्र भोंडेकर यांनी आज प्रभाग क्रमांक ८, ९ आणि १० मध्ये व्यापक दौरा करून नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्यात नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच शिवसेना (शिंदे गट) चे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दौरा दरम्यान डॉ. अश्विनीताईंनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपला स्पष्ट आणि व्यापक दृष्टिकोन मांडला. त्यांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्तेविकास, प्रकाशयोजना, बाजार व्यवस्थापन, सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर उपाययोजना सांगत नागरिकांना आश्वस्त केले. त्या म्हणाल्या की, शिवसेनेची सत्ता नगरपरिषदेमध्ये आल्यास भंडारा शहराचा सर्वांगीण कायापालट होईल. शहरी सुविधा, जलव्यवस्था, पायाभूत सुविधा, महिला-सुरक्षा आणि तरुणांसाठी संधी या प्रत्येक क्षेत्रात आमच्या विकास योजनांमुळे सकारात्मक बदल दिसेल. प्रभागातील नागरिकांनीही विविध समस्यांची मांडणी करत डॉ. भोंडेकर यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.भंडारा नगरपरिषद निवडणुकीत हा दौरा उत्साहवर्धक वातावरण निर्माण करणारा ठरला असून, डॉ. अश्विनीताईंच्या प्रचाराला अधिक गती मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.









