अस्वलाच्या हल्ल्यात जखमी वनमजुरांची वनमंत्र्यांनी घेतली भेट

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील कपाळदेव नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ९४ मध्ये २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी गस्तीवर असलेल्या वनरक्षक तथा वनमजूरांवर अस्वलाने प्राणघातक हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना घडली. नियमित गस्तीदरम्यान झालेल्या अचानक हल्ल्यात वनरक्षक माणिकराम गोविंदा चौधरी व वनमजूर गुणेश हिवराज शहारे हे गंभीर जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर वनरक्षकांची प्रकृती स्थिर असली तरी गंभीर जखमी मजुरांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार तातडीने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. जखमी मजुरांवर नागपूर येथे पुढील उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची पाहणी करण्यासाठी २४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक यांनी रुग्णालयाला भेट दिली.

यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी, उपवनसंरक्षक व क्षेत्रसंचालक (ना.ना.व्या.रा.) पियुषा जगताप, उपसंचालक प्रितमसिंग कोडापे तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी गावंडे (एमएस) आणि त्यांची टीम उपस्थित होती. मंत्र्यांनी जखमी मजुरांच्या उपचारांची सविस्तर माहिती घेत कुटुंबीयांशी संवाद साधला. या दुर्घटनेचे गांभीर्य ओळखत त्यांनी शासन स्तरावरून शक्य ती सर्व मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले. वनक्षेत्रात गस्ती करणाऱ्या कर्मचारी आणि मजुरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना अधिक मजबूत करण्याचा संदेशही यावेळी स्पष्टपणे देण्यात आला. वन्यजीवमानव संघर्षातील ही घटना पुन्हा एकदा जंगलात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या धोकादायक परिस्थितीची जाणीव करून देणारी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *