विदर्भात काँग्रेस नेतेच एकमेकांचे तोंड पाहत नाहीत
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- काँग्रेसचे नेते कुठे आहेत. त्यांचे खासदार करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित करून विदर्भात काँग्रेसचे नेते एकमेकांचे तोंडही पाहत नाहीत, अशी टिका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पवनी, साकोली, तुमसर, आणि भंडारा येथे सभा झाल्या. यावेळी मंचावर आ. डॉ. परिणय फुके, जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे, जॅकी रावलानी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मथुरा मदनकर तसेच भाजपा पदाधिकारी व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.
भंडारा येथे किसान चौकात झालेल्या सभेत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. भाजपच्या कमळामागे पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विकासाभिमुख विचारसरणी आहे; तर पंजाच्या मागे भकास आणि भांडणाशिवाय काहीच नाही, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस खालावत असून विजय वडेट्टीवार – नाना पटोले यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे पक्ष झपाट्याने ढासळत आहे. अनेक नेते काँग्रेस सोडून भाजपाच्या विकासाच्या भूमिकेवर एकवटत आहेत, असे हल्लाबोल करत त्यांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीत विक्रमी मतदान करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देवश्री कापगते यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या “बटेंगे तो कटेंगे’ या विधानाचा पुनरुच्चा केला.









