जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
अकोला:- राज्यातील विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा करिश्मा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या प्रचार सभांमध्ये लाडक्या बहिणींना योजनेबाबतचं आश्वासन देत आहेत. काहीही झालं तरी ही योजना बंद पडणार नाही, असं ते ठासून सांगत आहेत. तसेच, लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच आमचं सरकार आल्याचेही ही मंडळी सांगते.
कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आश्वासन देत जोपर्यंत एकनाथ शिंदे आहे, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असे सांगितले होते. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही लाडक्या बहिणींना शब्द दिला. अकोला जिल्ह्यातील हिवरखेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने जाहीर सभा झाली.
यावेळी, बोलताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांना घरं, शिक्षण आणि आरोग्य सुविधा दिल्या. आमच्या महाराष्ट्रातील विजयाला २३ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झालं. लोक म्हणत होते आता हे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार. पण, मी माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्रीआहे, तोपर्यंत लाडकी बहिण योजना तुमचा हा देवाभाऊ बंद होऊ देणार नाही, असा शब्दच अकोल्यातली सभेतून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना दिला.









