जिवास्म शास्त्रज्ञ प्रा. दशरथ कापगते थायलँडला जाणार
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- चवथ्या आंतरराष्ट्रीय जिवास्मशास्त्रज्ञांच्या जागतिक परीषदेचे आयोजन थायलँड येथील महासराखाम विद्यापिठात २२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत, त्यानंतर २७ ते २९ नोव्हेंबर मध्ये सातून येथील युनेस्को जागतीक जिओपार्क मध्ये सोंगखेला राजाभाट विद्यापिठातर्फे आयोजीत आंतरराष्ट्रीय विज्ञान परीषदेत येथील आंतरराष्ट्रीय जिवास्मशास्त्रज्ञ प्रा. दशरथ कापगते यांना आमंत्रीत करण्यात आले आहे. त्यामध्ये ते मध्य भारतातील जिवास्मावर माहिती सादर करणार आहेत. त्यानंतर ८ ते १० डिसेंबर ला अयोध्या येथील डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापिठात १३ व्या आंतरराष्ट्रीय विज्ञान परीषदेला ते सहभागी होणार आहेत.
प्रा. कापगते जे.एम. पटेल महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख पदावरून निवृत्त झाले असून ४५ वर्षापासून त्यांचे मध्यभारतातील जिवास्मावर अविरत कार्य सुरू असून त्यांचे १७८ संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. यापूर्वी त्यांनी आस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप, जपान, आर्यलँड व चिनचा संशोधनानिमित्ताने दौरा केला आहे व त्यांचे आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांसोबत अजुनही संशोधन कार्य सुरू आहे. त्यांनी अमेरीकेतील फ्लोरीडा विद्यापिठातील फ्लोरीडा म्युझियम ऑफ नॅचरल सायन्स येथे मानद प्राध्यापक पदावर कार्य केले असून त्यांनी तेथे भारतीय जिवास्मावर स्वतंत्र दालनाची स्थापना करून जगातील वैज्ञानिकांना त्यावर पुढील संशोधनाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
त्यांच्या या अविरत संशोधन कार्याची दखल घेत त्यांच्या आदराप्रित्यर्थ, झाडाच्या खोडास (लाकडास) कापगते ओक्झायलान, पानास कापगते ओफायलम, फळास कापगते ओकारपान व फुलांच्या जिवास्मास कापगत ेयानथस अशी नावे देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. प्रा. कापगते गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा जवळ वडाधाम येथे महाराष्ट्रातील पहिल्या जिवास्म उद्दानाचे संशोधन व तांत्रिक सल्लागार आहेत. त्या ठिकाणी १८-२५ कोटी वर्षापूर्वी डायनोसार व इतर महाकाय प्राण्यांच्या सोबत महाकाय वनस्पतीचे सुध्दा जिवास्म आढळतात. त्यामुळे त्याला जागतिक महत्व प्राप्त झाले आहे.









