सर्वोच्च नक्षल कमांडर माडवी हिडमा पत्नीसह चकमकीत ठार ; आंध्र-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलांची मोठी कारवाई
गोंदिया :- शेकडो सुरक्षा जवान आणि नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असलेला, “पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी’ चा प्रमुख आणि जहाल नक्षलवादी नेता माडवी हिडमाला (४४) ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेवरील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यात सुरक्षा दलांनी ही मोठी कारवाई केली. या कारवाईत हिडमाची पत्नी राजे उर्फ राजक्का हिच्यासह सहा नक्षल मारले गेल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली आहे.
वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा त्रि-सीमा परिसर नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानला जातो.या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांचे अनेक गुप्त तळ असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी अत्यंत सुनियोजित पद्धतीने ही मोहीम आखली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास जवानांनी नक्षलवाद्यांच्या तळाला वेढा घातला असता, दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला. या धुमश्चक्रीत माडवी हिडमा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. घटनास्थळावरून किमान सहा नक्षल्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरू आहे. हिडमा मारल्या गेल्याने शेवटची घटका मोजत असलेल्या नक्षलचळवळीला हादरा बसला आहे.









