अंबागड किल्ल्यावर “बा रायगड परिवार तर्फे भव्य स्वच्छता श्रमदान व गडपूजन मोहीम संपन्न
.
लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात सातपुडा पर्वतरांगेत वसलेला अंबागड हा वनदुर्ग इतिहासाचा थोर वारसा जपणारा गड आहे. अनेक वर्षां पासून अत्यंत दुर्लक्षित, अंतिम घटका मोजत असलेल्या या किल्ल्याकरिता किल्ले अभ्यासक, कार्यकर्ते मो. सईद शेख यांनी किल्ल्याला ऊर्जितावस्था मिळिवण्यासाठी तब्बल २० वर्ष कसोशीने प्रयत्न केले.
प्रयत्नास यश आले आणि २००४ मध्ये किल्ल्याला शासन तर्फे संरक्षित वास्तू घोषित करून २ कोटी ३० लाख रू. मंजूर करण्यात आले आणि पुरातत्त्व विभागाने डागडुजी केली. तरीही गेल्या काही वर्षांत झाडी, गवत व कचऱ्यामुळे किल्ल्यावरील अनेक वास्तू कोसळण्याच्यामार्गावर होत्या. या पार्श्वभूमीवर बा रायगड परिवार, नागपूर विभाग यांच्या वतीने अंबागड स्वच्छता व संवर्धन मोहीमेचे आयोजन करण्यात आले.
या मोहिमेत २५० ते ३०० सदस्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत गडाच्या प्राचीन वारशाला नवी झळाळी दिली. मोहीमेअंतर्गत अंबागडकिल्ल्यावरील मोठ्या टाक्याजवळील परिसर, बालेकिल्ल्याकडे जाणारा मार्ग तसेच महादरवाज्याजवळील तटबंदी व बुरुज परिसरातील झाडी, गवत आणि कचरा पूर्णपणे दूर करण्यात आला. किल्ल्यावर कोरलेल्या अनेक नावांना ओल्या फळक्याने स्वच्छ करण्यात आले. पाण्याची टाके पूर्णपणे साफ करून किल्ला निर्मल व सुंदर करण्यात आला. ही मोहीम या वर्षीच्या उपक्रमातील विशेष उल्लेखनीय बाब ठरली. श्रमदानानंतर मान्यवरांकडून अंबागडचा इतिहास, महत्व आणि भूवैविध्याची माहिती देण्यात आली. तसेच शिवकालीन मर्दानी आखाड्याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
सामूहिक भोजन, भंडाराउधळून गडपूजन विधी पार पडला. सर्व सहभागी सदस्यांनी पुढील मोहीमेतही सक्रिय सहभाग देण्याची तयारी दर्शवली. मोहीमेस मार्गदर्शन करणारे आणि उपस्थित मान्यवर प्रशांत सवई (उपसंचालक, पर्यटन विभाग, नागपूर), चेतन वानखेडे शिवबा राजे फाउंडेशन, शिवा दादा काळे व प्रतीक दादा पठारे अभ्यासक, स्वराज्य सेवा प्रतिष्ठान, राजु खवसकर व अमोल माणुसमारे रेड क्रॉस ग्रुप, मौदा, हितेश दादा डफफ व निलेश दादा गाढवे, चरण दादा गुरनुले, नागभीड महावीर बजरंग तालीम संघ कुंभारी सहपरिवार उपस्थित होते. या मोहीमेला पर्यटन व इतिहास अभ्यासक मो सईद शेख, पुरातत्व विभागाचे उपसंचालक मयुरेश खडके यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.









