आष्टी येथील शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीत आढळला

 तुमसर:- तुमसर तालुक्यातील आष्टी येथील एका शेतकऱ्याचे शेतालगतच्या अन्य शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला. सदर घटना दि. १५ नोव्हेंबर रोजी रात्री उघडकीस आली आहे. हरिभाऊ कुसन गौपाले (५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आष्टी येथील भोजराम गौपाले, भाऊ विश्वनाथ व मृतक हरिभाऊ हे तिघेही भाऊ एकत्र राहत आहेत. घटनेच्या दिवशी भोजराम व भाऊ विश्वनाथ हे धान बांधणीकरीता शेतात गेले होते. सायंकाळी घरी आले असता मृतक घरी दिसून आला नाही.

घरच्यांना विचारले असता शेतावर जातो म्हणून मोटारसायकलने निघून गेल्याचे सांगितले. रात्र होवूनही तो घरी परतला नसल्याने त्याच्या कुटूंबियांनी इतरत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. शोध घेत असताना पुतण्या राहूल याला शेताजवळील ईश्वर गौपाले यांच्या शेतातील विहिरीजवळ मृतकाची चपल व मोबाईल दिसून आल्याने संशय बळावला. विहिरीत गळ टाकून पाहिले असता प्रेत गळाला लागले. गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे. मात्र या घटनेने उलटसुलट चर्चांना उधान आले असून शेतकरी हरिभाऊ गौपाले याची आत्महत्या की अन्य. घटनेचे गुढ अद्यापही कायम असून तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात गोबरवाही पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या तपासाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *