नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी मतदान पथके रवाना

२१ हजार ३४९ मतदार बजावणार हक्क

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यात प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून गुरुवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

आज उपजिल्हाधिकारी (निवडणूक) यांनी मतदान पथकांना अंतिम प्रशिक्षण व सूचना दिल्या. त्यानंतर मतदान पथकांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले असून पथके मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत. प्रत्येक केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील अंतिम मतदार आकडेवारीनुसार, एकूण २१,३४९ मतदारांपैकी १३ हजार २४७ पुरुष आणि ८ हजार १०२ महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात १ हजार ३४ दिव्यांग मतदार असून त्यामध्ये ७२८ पुरुष आणि ३०६ महिला मतदार आहेत. तसेच ८० वर्षावरील ३५ ज्येष्ठ मतदार आहेत. या सर्व मतदारांना मतदान केंद्रांवर सहजतेने आणि विनाअडथळा मतदान करता यावे यासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भंडारा जिल्ह्यात एकूण ३५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेत सर्व पात्र मतदारांना सहभागी होता यावे यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी पात्र पदवीधर मतदारांनी निर्धारित वेळेत आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावावा. मतदानासाठी येताना आवश्यक वैध ओळखपत्र सोबत आणावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *